नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत धडगाव परिसरातील विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य जान्या पाडवी, उपअभियंता एम. एस. नाईक, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते खांडबारा ते हालीगव्हाणपाडा या तीन कोटी १४ लाख खर्चाच्या, शिरसाणी ते बुचक्यापाडा साडेतीन किलोमीटच्या कामासाठी तीन कोटी ७९ लाख, खरवड ते सरपंचपाडा या ८७० मीटर रस्त्यासाठी एक कोटी तर काकरपाटी ते पाटीलपाडा या १.९२ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी एक कोटी ७९ लाख रुपये निधी मंजूर झाला असून, या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री पाडवी यांनी शिरसाणी येथील नागरिकांशी संवाद साधला. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत धडगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यात येईल. दुर्गम भागातील पाडे रस्त्याद्वारे जोडल्याने नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस फंडांतर्गत समाजकल्याण विभागातर्फे तेरसिंग पावरा यांना देण्यात आलेल्या सोलरपंपाचे उद्घाटन पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या हस्ते झाले. भूगर्भातील पाणीपातळी लक्षात घेऊन सोलरपंपाचे वितरण करण्यात यावे, अशी सूचना पाडवी यांनी यावेळी केली.