नवापूर : धनगर समाजाला अप्रत्यक्षरित्या अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या निर्णयाच्या जाहीर निषेधार्थ मंगळवारी नवापूर शहर व तालुक्यात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. आदिवासी समाज व आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी या बंदचे आयोजन केले होते. व्यापा:यांनी 100 टक्के व्यवहार बंद ठेवले होते. दरम्यान, तालुक्यातील खांडबारा व विसरवाडी येथेही बंद पाळण्यात आला.धनगर समाजाला देऊ केलेल्या सवलतीसंदर्भात नवापूर तालुका आदिवासी समाजातर्फे पालिका सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, दिलीप नाईक, पालिकेचे गटनेते गिरीश गावीत, राष्ट्रवादीचे राया मावची, पं.स.चे माजी सभापती विनायक गावीत, काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष आर.सी. गावीत, मनोज वळवी, रॉबेन नाईक व सहकारी उपस्थित होते. या वेळी दिलीप नाईक यांनी सांगितले की, धनगर समाजाला आधीच तीन टक्के आरक्षण असताना आदिवासी समाजासाठी असलेल्या साडेसात टक्के आरक्षणातून सवलती देण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा प्रय} कोणत्याही परिस्थितीत आदिवासी समाज खपवून घेणार नाही. शासनाच्या या धोरणाला हाणून पाडण्यासाठी सर्व समाज संघटीत होऊन तीव्र लढा दिल्याशिवाय राहणार नाही. केंद्र व राज्य शासन जे करु शकत नाही ते न्यायालयाच्या माध्यमातून भाजप सरकार षडयंत्र करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. भरत गावीत म्हणाले की, आदिवासींच्या सर्व योजना बंद करण्यामागे राज्यातील भाजप सरकार लागले आहे. त्यामुळे आदिवासींच्या न्याय हक्कावर गदा आलेली आहे. म्हणून सर्व आदिवासी समाज संघटीत होऊन आदिवासीविरोधी निर्णय रद्द करण्यासाठी तिव्र लढा उभारणार आहे. शासनाचा कुटील डाव हाणून पाडल्याशिवाय आदिवासी समाज स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आर.सी.गावीत म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण वाढवून दिल्यास आदिवासी समाजाचा विरोध नाही. पंरतु धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती देऊ नये. घटनेने दिलेले अधिकार, न्याय हक्क व संविधान वाचविण्यासाठी आदिवासी समाज संघटीत होऊन सरकारच्या विरोधात लढा उभा करुन आदिवासी विरोधी निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, असे सांगितले.नवापूर बंद शांततेत पार पडला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, संदीप पाटील व सहकारी पोलीस कर्मचा:यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, तालुक्यातील विसरवाडी व खांडबारा येथेही शांततेत बंद पाळण्यात आला.
नवापूर, खांडबारा व विसरवाडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:05 IST