तळोदा शहरातील खान्देशी गल्ली परिसरात गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली आहे. गटारींची स्वच्छता नियमित केली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून एका नागरिकाने स्वत: गटार साफ केली. त्यांचा गटार सफाईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रभागातील नगरसेवक गौरव वाणी यांनी लागलीच दखल घेऊन सफाई कर्मचाऱ्यांना सूचना दिली. त्यामुळे लागलीच पालिकेचे स्वच्छता कर्मचारी तेथे आले. त्यांनी परिसरातील सर्व गटारी स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पालिकेने स्वच्छता ठेक्याची कार्यवाही त्वरित करावी
शहरातील स्वच्छतेचा ठेका गेल्या एप्रिल महिन्यापासून संपलेला आहे. असे असताना अजूनही स्वच्छतेच्या ठेक्याची कार्यवाही न करण्यात आल्याने नागरिकांना अशा साफसफाईच्या प्रश्नाला सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. सफाई कर्मचारी ठरावीक ठिकाणीच सफाई करीत असतात. शिवाय घंटागाडीदेखील दोन दिवसांनंतर कचरा संकलनासाठी येत असते. त्यामुळे गोळा झालेल्या कचऱ्याचा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहतो, अशी व्यथाही येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
वास्तविक, पावसाळ्यापूर्वी गल्लीबोळांतील गटारींमधील साचलेली घाण काढणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. या साचलेल्या घाणीमुळे पाण्याचा निचरा होत नाही. हे पाणी रस्त्यावरच साचत असते. परिणामी दुर्गंधीचाही सामना येथील रहिवाशांना करावा लागतो.
नगरपालिकेचा स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत संपलेली आहे. नवीन टेंडरची कार्यवाही सुरू असून, यापुढे साफसफाईची कामे नियमित केली जातील. तरीही प्रभागातील नागरिकांनी स्वच्छतेबाबत ज्या अडचणी आहेत त्या मला सांगाव्यात. जेणेकरून तत्काळ उपाययोजना करण्यास मदत होईल. यापुढे अशी तक्रार येऊ देणार नाही याची काळजी घेऊ. नागरिकांनीही स्वच्छतेविषयी पालिकेला कळविले पाहिजे.
गौरव वाणी, नगरसेवक, तळोदा पालिका
गल्लीत कोणत्याही प्रकारची स्वच्छता वेळोवेळी केली जात नाही. ठरावीक ठिकाणीच साफसफाई केली जाते. तसेच घंटागाडी दोन-चार दिवसाआड येते. यामुळे प्रभागातील नागरिक अत्यंत नाराज आहेत.
- सौरभ परदेशी, नागरिक, तळोदा