लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील सरपणी नदीला मागील वर्षाप्रमाणेच पूर आला असून पुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सतर्कतेचा इशारा म्हणून नदीकाठावरील नागरिकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळपासून परिसरात संततधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने येथील सरपणी नदीला महापूर आला आहे. नदीकाठावर मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनातर्फे संरक्षण भिंत उभारण्यात आली होती. तरीही नदीकाठावरील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने धावपळ उडाली. सतर्कतेचा इशारा म्हणून विसरवाडीचे सरपंच बकाराम गावीत यांनी नदीकाठावरील नागरिकांना इतरत्र हलवण्याची सूचना केली होती. तसेच काही नागरिकांची सोयदेखील करून दिली. विसरवाडी गावातही शनी मंदिर परिसर जलमय झाला असून नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. या परिसरात तीन ते चार फूट उंच पाणी साचलेला आहे. अंगणवाडीतही पाणीच पाणी साचले आहे त्यामुळे येथे दोन-चार दिवस सुट्टी द्यावी लागेल, अशी स्थिती आहे. नदीला आलेला पूर पाहण्यासाठी सकाळपासूनच सर्व वयोगटातील नागरिकांनी नदीकाठी एकच गर्दी केली.
विसरवाडीत महापुरामुळे नागरिकांना हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:42 IST