एकीकडे शेतकऱ्यांना यंदा फटका बसला असताना गेल्या वर्षातील लाॅकडाऊनपूर्वी नंदुरबार बाजार समितीत १ लाख ८९ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. ही मिरची व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यानंतर लाॅकडाऊन सुरू झाल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला होता. मिरचीचा साठा केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मजूर नसल्याने उद्योजकांच्या समस्या वाढल्या होत्या.
मार्च २०२० पासून वाहतूक बंद असल्याने व्यापाऱ्यांना पावडर तयार करून निर्यात करणे जमत नव्हते. मार्च ते जून या चार महिन्यात या उद्योगात उलाढाल थांबल्याने १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उद्योजक देत आहेत. यातून पुढे मार्ग काढत मजुरांना आणून उद्योग सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यापासून मिरची उत्पादनांची वाहतूक सुरू झाली होती.
तूर्तास जिल्ह्यातील विविध भागासह गुजरात राज्यातील मिरची खरेदी करून पथारींवर सुकवण्याचा उद्योग जोरदारपणे सुरू आहे. सुकवलेली मिरची उद्योजक पुन्हा पावडर तयार करणाऱ्यांना विक्री करतात. परंतु मागील एक महिन्यात खराब झालेले हवामान आणि पाऊस यामुळे सुमारे एक कोटीपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. यातून उत्पादन कमी आल्याने यंदा मिरची पूरक उद्योगांना जूनपर्यंत पुरेल एवढेच कच्चा माल रूपी उत्पादन मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात या उद्योगासमोर कच्चा माल आणून प्रक्रिया करत उद्योग सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.