नंदुरबार-विसरवाडी मार्गावर सरपणी नदीच्या पुलावर मयूर जितेंद्र देवरे (१४, रा.शनी मंदिर परिसर, विसरवाडी) हा बालक सायकल चालवत असताना नंदुरबारहून सुरतकडे भरधाव वेगाने जाणारी रुग्णवाहिका (क्रमांक जी.जे.३ बी-८७२६) वरील वाहन चालकाचा ताबा सुटल्याने त्याने मयूर देवरे या बालकास धडक दिली. या अपघातात मयूर देवरे यास छातीला, डोक्याला व हाताला मार लागला. अपघातानंतर रुग्णवाहिका चालकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यास रुग्णवाहिकेतून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व तेथून तो गुजरातकडे जाण्यास निघाला.
या घटनेची माहिती मिळताच विसरवाडी येथील व्हाॅट्सअप ग्रुपवर जखमी मयूर देवरे याचा जखमी अवस्थेतील फोटो वायरल होऊन त्याच्या आई-वडिलांना बोलावण्यात आले. मयूर देवरेवर येथे प्राथमिक उपचार करून त्यास नंदुरबार येथील एका खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी नवापूर पोलिसांना दिली. त्यावरून नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी तेथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ॲम्ब्युलन्स चालक पुरवाल रमेशभाई सोलंकी यास रुग्णवाहिकेसह पिंपळनेर चौफुलीवरून ताब्यात घेतले व त्यास विसरवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.