लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोर अर्थात बांड म्हटल्याचा राग येऊन एकाने खरच चोरी करून बदला घेतल्याची घटना बालहाट, ता.नवाूपर येथे घडली. या घटनेतील संशयीतास एलसीबीने अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा एक लाख १९ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.१० जून रोजी बालहाट येथील मलामजी मोत्या गावीत यांच्या घराच्या मातीकुडाच्या घराची भिंत तोडून चोरट्याने स्टिलच्या डब्यातील एक लाख १९ हजार रुपयांचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत एलसीबीने समातर तपास सुरु केला होता. एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला तेथे पाठविले. गावातील सरीपाटी नदीच्या काटेरी झुडपांमध्ये अमित निमा गावीत हा बसला होता. त्यास ताब्यात घेत चोरी संदर्भात विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याला गुन्हे शाखेत आणल्यावर त्याचे अवसान गळाले. आणि त्याने चोरीची कबुली देत त्याचे कारणही अजबच सांगितले.चोरी ज्यांच्या घरी झाली ते मलामजी गावीत हे नेहमीच अमित यास बांड अर्थात चोर म्हणून टोचून बोलत होते. त्यामुळे त्यास अपमानास्पद वाटत होते. त्यामुळे मलामजी यांना धडा शिकवायचाच म्हणून अमित याने मनाशी खूनगाठ बांधली. १० जून रोजी रात्री मलामजी हे त्यांच्या नवीन घरात झोपण्यासाठी गेले असता ती संधी साधत अमित याने त्यांच्या घराच्या कुडाची भिंत तोडून आत प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले एक लाख १९ हजार रुपयांचे दागीने आणि रोख रक्कम चोरून नेली.चोरलेला ऐवज गावातीलच नदीच्या काठावर जावून तेथे खड्डा खोदून लपविला. पथकाने त्याला नदीकाठावर घेवून जावून ऐवज हस्तगत केला.चोरीचा घटनेची उकल अवघ्या ३ दिवसात करण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार रवींद्र पाडवी, महेंद्र नगराळे, दादाभाऊ वाघ, दादाभाई मासुळे, राकेश वसावे, शांतिलाल पाटील, जितेंद्र तोरवणे, अमित वसावे यांच्या पथकाने केली.
बालहाटसारख्या छोट्याशा गावात सव्वा लाखाची चोरी झाल्याच्या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले होते. छोट्या गावात होणाऱ्या चोºया या स्थानिक माहितीगार यांच्याकडूनच होत असतात हे लक्षात घेऊन एलसीबीने त्या दिशेने तपासाला गती देताच संशयीत अलगद जाळ्यात सापडला.