लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 9 : बनावट दारू तयार करण्याच्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून 32 हजार रुपयांचे रसायन व बनवाट दारू जप्त केल्याची घटना वागदा, ता.नवापूर शिवारात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयीत राजेश वसावे याच्यावर गुजरात व महाराष्ट्रात अवैध दारू विक्री, शस्त्र बाळगणे आणि पोलिसांवर हल्ल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.वागदा शिवारात बनावट दारू तयार करण्याचा अड्डा व अवैध लाकूड साठा असल्याची माहिती विसरवाडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी वागदा शिवारातील राजेश प्रभाकर वसावे यांच्या शेतात धाड टाकली. तेथे बनावट दारू करण्याचे साहित्य व दारू मोठय़ा प्रमाणावर आढळून आली. त्यात बूच पॅक करण्याचे मशीन, 70 लिटर स्पिरीट, दारूला रंग देण्याचे केमीकल, दारूला वास येण्यासाठीचे केमीकल, रॉयल डिस्टीलरी स्लाईस नाव लिहिलेली पुठ्ठे व लेबल, पुठ्ठे पॅक करण्याचे मशीन, प्लॅस्टिकचे नरसाळे, बाटल्या, इम्पेरियल ब्लू व्हिस्कीचे लेबल लावलेल्या बाटल्या, बुच, रॉयल स्टॅग लेबल लावलेल्या बाटल्या आदींसह इतर 32 हजार 100 रुपयांचे साहित्य आढळून आले.याबाबत पोलीस नाईक विजय वळवी यांच्या फिर्यादीवरून राजेश प्रभाकर वसावे, रा.वागदा, ता.नवापूर याच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक निरिक्षक पाटील व जमादार गावीत करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील, उपनिरिक्षक बि:हाडे, हवालदार दयाराम वळवी, राजेश येलवे, विजय वळवी, विनायक सोनवणे, तुषार पाडवी, मुकेश साळवे, भालचंद्र जगताप, अतूल पानपाटील, अधिकार साबळे, मन्साराम पाटील, दिपक चौधरी, स्मिता पाटील यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
वागदा शिवारात बनावट देशी, विदेशी दारूच्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:06 IST