लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : राष्ट्रीय महामार्गावर शहरापासुन पाच किमी अंतरावर रायगंण नदीच्या पुलावरून ३५ फुट खोल असलेल्या नदीपात्रात कार कोसळल्याने दोन जण जखमी झाले. पैकी एकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी पाच वाजता हा अपघात घडला.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेरहून गुजरात राज्यातील बडोदा येथे दोघे जण कार (क्रमांक एम एच १९ सी व्ही १९१०) ने जात होते. आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास नवापूर शहरापासुन पाच किमी अंतरावर रायगंण नदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ३५ फुट खोल नदी पात्रात पडली.कार मध्ये चालक शुभम राजेश पटेल (२४) रा. बडोदा गुजरात व विपूल गोपाल पटेल (२८) रा. भटाईनगर जामनेर जिल्हा जळगाव असे दोनच व्यक्ती होते. त्यात चालक शुभम पटेल जबर जखमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.नदीपात्रात पाणी असल्याने कार खडकावर आदळुनही त्याची तिव्रता कमी झाली. कार नदीपात्रात पडल्याचा आवाज एकुन जवळ असलेल्या स्थानिक लोकांनी नदीत उडी मारून दोघांना कारमधुन बाहेर काढले व १०८ रूग्णवाहिकेस पाचारण केले. रूग्णवाहिका चालक लाजरस गावीत यांनी तातडीने उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.नवापूर उपजिल्हा रुग्णालयात त्यांचेवर प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रायंगण पुलावरून कार कोसळली सुदैवाने जिवीत हानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:55 IST