जयनगर : बऱ्याच दिवसांपासून शहादा आगाराची जयनगरपर्यंतची बसफेरी बंद असल्याने जयनगरसह परिसरातील गावांमधून अवैध वाहतूक वाढली आहे. जयनगरसह, कोंढावळ, वडाळी, निंभोरे, धांद्रे, उभादगड, लोंढरे, कहाटूळ या गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शहादा या तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बस नसल्याने आपल्या सोयीनुसार मिळेल त्या वाहनाने जावे लागत आहे. परिणामी अवैध वाहतूक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये शहादा आगाराची बस सुरू न झाल्याने लोकांची गैरसोय होत आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर दीड महिन्यापूर्वी शहादा आगाराची बस सुरू झाली होती. मात्र, थोड्याच दिवसात पुन्हा शहादा आगाराने जयनगर येथील बस फेरी बंद केली. जयनगरसह परिसरातील गावांमधील ग्रामस्थ, शेतकरी शहादा जवळ असल्याकारणाने बी-बियाणे व किराणा माल घेण्यासाठी जात असतात. तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात लहान पोरांच्या तब्येतीवर परिणाम होत असतो. त्यांनाही शहादा येथे बाल रुग्णालयात घेऊन जाताना बसेस नसल्याने खूपच त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास शहादा ते जयनगर दरम्यान सर्वच गावांमधील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पूर्वी दिवसाला पाच ते सहावेळा जयनगरपर्यंत शहादा आगारातील बसफेऱ्या लावल्या जात होत्या. मात्र, आता दिवसातून एकही फेरी होत नाही. राज्यात बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बसेस चालू झाल्या आहेत. दोंडाईचा आगारातून सारंगखेडा- जयनगर मार्गे जावदे या गावापर्यंत बस चालू आहे. मात्र, शहादा जाण्यासाठी बसेस नसल्याने येथील नागरिकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
ज्यांच्याकडे मोटारसायकल आहे. ते आपल्या मोटारसायकलीने शहादा येथे कामानिमित्त जात असतात. मात्र, ज्या लोकांकडे मोटारसायकल नाही अशा लोकांना अवैध वाहतुकीने प्रवास करावा लागत आहे. मोटारसायकलवाल्यांनाही पेट्रोलचे भाव खूपच वाढल्याने नेहमी मोटारसायकलने जाणे परवडत नाही. याचा फायदा घेत अवैध वाहतूकवाले मनमानी भाडे आकारत असल्याचे निदर्शनास येत आहे.
विद्यार्थ्यांना भुर्दंड
दरवर्षी दहावीचा निकाल घोषित झाल्यावर विद्यार्थी शहादा येथे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच डोमिसाईलचे प्रमाणपत्र काढण्यासाठी शहादा सेतू केंद्रात जात असतात. मात्र, बस फेरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना शहादा येथे जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. सोबत ग्रामस्थांनाही शासकीय कार्यालयात अथवा बँकेत पीककर्ज काढण्यासाठी शहादा येथे जाण्यासाठी अवैध वाहतुकीशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव अवैध वाहतूकवाल्यांच्या मनमानीनुसार भाडे द्यावे लागत आहे. एकंदरीत जोपर्यंत शासनाच्या बसेस बंद आहेत, तोपर्यंत खासगी वाहतुकीमुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी शहादा आगारातून दिवसातून निदान दोन ते तीन फेऱ्या तरी जयनगरपर्यंतच्या सुरू करायला हव्यात, अशी मागणी शहादा ते जयनगर मार्गावरील ग्रामस्थांनी केली आहे.