तळोदा : शहरातील जिल्हा रुग्णालयानजीक असलेल्या दोघा महिला शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात शाॅर्टसर्किटने लागलेल्या आगीत साधारण पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, नगर पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचेपर्यंत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. यात संबंधित शेतकऱ्यांचे चार लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने इतरांचा ऊस वाचला. परंतु वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या वीज तारांबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तळोदा येथील महिला शेतकरी वनमाला विनोद सूर्यवंशी व अंजनाबाई रमेश टवाळे यांचे तळोदा शहरानजीक असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाजवळ उसाचे क्षेत्र आहे. त्यांनी आपल्या मालकीच्या असलेल्या आग्यावड शिवारातील साडेतीन एकरात ऊस लावलेला आहे. बुधवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे शेतात शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला.
यात वनमाला विनोद सूर्यवंशी यांच्या (गट क्रमांक ३२१) शेतात साडेतीन एकर तर तेथेच लागून असलेल्या अंजनाबाई टवाळे यांच्याही दीड एकर उसाला आग लागली. त्यामुळे या दोन्ही महिला शेतकऱ्यांचा साधारण पाच एकर ऊस जळाला आहे. हा ऊस नोहेंबरमध्ये लागवड केला असून, तो परिपक्वदेखील झाला होता. मात्र, वीज वितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांनी तो बेचिराख केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग विझविण्यासाठी नगरपालिकेचा अग्निशमन बंब शेतात पोहचला असला तरी तोपर्यंत ऊस जळून खाक झाला होता. सुदैवाने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यामुळे इतरांचा ऊस वाचला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आधीच शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीने हताश
सध्या पावसाने प्रचंड ओढ दिली आहे. त्यामुळे या अस्मानी संकटांबरोबरच महावितरणचे सुलतानी संकट कोसळल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिसरातील शिवारातून महावितरणचे विजेचे खांब टाकण्यात आले आहेत. तेही वाकले आहेत. शिवाय ताराही प्रचंड लोंबकळलेल्या आहेत. ऊस उंच झाल्याने त्यांचा पिकास स्पर्श होत असल्याचे शेतकरी सांगतात. मात्र, महावितरणकडून योग्य देखभाल केली जात नाही. परिणामी अनेक ठिकाणी तारांमध्ये अंतर कमी होऊन घर्षण होते. अशाच प्रकारे शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याच्या घटना तळोदा तालुक्यात घडत आहेत. दुष्काळात पाण्याची कमतरता असताना कसेबसे जगवलेले उसाचे पीक ऐन तोडणीस आले असताना विजेच्या शॉर्टसर्किटमुळे डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ऊस जळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.