नंदुरबार : लहान असो व मोठा, गरीब असो वा श्रीमंत सर्वच स्तरातील खवय्यांची पहिली पसंत असलेला वडापाव आजही किमतीबाबत स्थिर आहे. विविध वस्तूंची महागाई वाढली तरी वडापाव आजही १३ ते १५ रुपयांमध्येच मिळत आहे. त्यामुळे खवय्यांची पसंती त्यालाच अधिक असल्याचे चित्र आहे.
वडापाव नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. चालता चालता सहज नास्ता म्हणून खाण्यासाठी वडापाव सर्वांत सोपा नाश्ताचा पदार्थ आहे. शहरात कामानिमित्त आलेल्यांना पोटपूजा म्हणून वडापाव हमखास आवडीचा पदार्थ आहे. एका पावमध्ये एक वडा त्यात दोन ते तीन प्रकारच्या चटणी लावून आणि सोबत सॅास अवघ्या १३ ते १५ रुपयांत कुणालाही सहज परवडतो. त्यामुळे वडापाव अस्तित्व टिकवून आहे.
नंदुरबारात विविध प्रकार...
वडापावचे नंदुरबारात विविध प्रकार मिळतात. मुंबईचा वडापाव गेल्या तीन ते चार वर्षांपासून मिळू लागला आहे. त्यापूर्वीपासूनच साधे वडे नंदुरबारात आवडीचा नाश्ता होता. दहा रुपयांमध्ये मध्यम आकाराचे तीन वडे आणि सोबत चटणी किंवा सॅास हॅाटेलमध्ये दिला जात होता. रस्सा वडा देखील नंदुरबारात प्रसिद्ध आहे. गरमागरम रस्स्यामध्ये एक मोठा वडा व त्यावर बारीक शेव, कोथिंबीर आणि दही टाकून मिळणारा वडा खाल्ला तर दिवसभर जेवणाची आठवणपण येणार नाही. अलीकडच्या काळात दोन मोठे वडे आणि सोबत लहान दोन पाव अशी वड्याची प्लेटदेखील मिळू लागली आहे. त्यासोबत जिलेबी असल्यास चव आणखी वाढते.
अनेकांचा सकाळचा नाश्ता वडापाव ठरलेला. तसा माझाही ठरलेला नाश्ता. सकाळी कामावर जाताना आपल्या ठरलेल्या लॅारीवर एक वडापाव खाऊनच कामावर जातो. परिणामी दुपारी जेवणाच्या सुट्टीपर्यंत भूक लागत नाही. स्वस्त आणि रुचकर शिवाय सहज मिळणारा हा नाश्ता आपला पूर्वीपासूनच आवडता आहे.
-सुदाम राजपूत,नंदुरबार.
तेल, बेसनपीठ, गॅस यांच्या किमती गेल्या सहा महिन्यांत २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्या आहेत. असे असतानाही आपण वडापावच्या दरात कुठलीही वाढ केली नाही. सर्वसामान्यांना परवडणारा नाश्ता असल्याने आपण किमतीत वाढ केली नाही. दिवसभर आपल्याकडे ग्राहकांची गर्दी असते. त्यांचे समाधान हाच आपला नफा.
- एक विक्रेता, नंदुरबार.