बामखेडा येथील रोहिदास छगन चौधरी यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यातून रविवार मध्यरात्र ते सोमवारी पहाटेदरम्यान ४० हजार रुपयांचा एक बैल अज्ञात व्यक्तीने चोरून नेला आहे. शेतकरी राेहिदास चाैधरी हे सोमवारी सकाळी गोठ्याकडे गेले असता बांधून ठेवलेल्या दोनपैकी एक बैल त्यांना दिसून आला. दुसरा बैल दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध केली. घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली होती. चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्जा राजाची चोरी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ऐन खरीप हंगामात शेत मशागतीच्या कामात व पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैल चोरी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.