लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतराष्ट्रीय निवासी शाळेची इमारत तोरणमाळ येथे साकारली जात आहे. या इमारतीच्या बांधकामाला भेट देऊन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी माहिती जाणून घेतली. इमारतीचे बांधकाम गुणवत्तापूर्ण पध्दतीने दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.महाराष्ट्र शासनाने राज्यातील बालकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संचलित इंग्रजी माध्यमाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अंतराष्ट्रीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे सुरू करण्यात आली आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या २९ शाळामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संचलित इंग्रजी माध्यमाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी अंतराष्ट्रीय निवासी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. ८०० मुले व ८०० मुली अशा १६०० विद्यार्थ्यांच्या निवासी स्वरूपातील शिक्षण घेण्याची सुविधा असलेल्या या शाळेच्या इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू असून, यासाठी सुमारे पंचावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्थाही केली जाणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून या शाळेला मान्यता मिळाली असून सद्यस्थितीत ही शाळा नंदुरबार येथे आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य इंग्लिश मिडीयम स्कुलच्या इमारतीमध्ये सुरू असून सध्या या शाळेत तोरणमाळ परिसरातील सुमारे तीनशे विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. तोरणमाळ येथील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना तेथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.या आंतरराष्ट्रीय शाळेच्या बांधकामाला नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. शाळेच्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त करतांनाच दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण पद्धतीने बांधकाम पूर्ण करण्याबाबत संबंधितांना त्यांनी सूचना दिल्या. यावेळी धडगावचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षण विस्तार अधिकारी योगेश सावळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बढे, केंद्रप्रमुख सुरेश तावडे, सर्व शिक्षा अभियानचे अभियंता विशाल पाटील, के.जी.वळवी आदी उपस्थित होते.सातपुड्याच्या दुर्गम भागातील तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत शिक्षण देणारी ही महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ संचलित निवासी शाळा या परिसरातील बालकांसाठी वरदान ठरणार आहे.
तोरणमाळ येथे इमारतीची सोय नसल्याने सध्या नंदुरबारातील एकलव्य निवासी इंग्रजी शाळेच्या आवारात ही शाळा भरत आहे. लवकरच तोरणमाळ येथील इमारत साकारली जाणार असल्याने पुढील शैक्षणिक वर्षापासून या ठिकाणी शाळा सुरू होईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही इमारत साकारल जावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन त्यासाठी प्रयत्नशील असून बांधकाम ठेकेदारास आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत.