शासकीय नोकरी करत असताना वाममार्गाने पैसे गोळा करून स्थावर आणि जंगम मालमत्ता घेत श्रीमंतीचा थाट बाळणाऱ्या काहींबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करण्यात येतात. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी संबंधित शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची चाैकशी करण्यासाठी तो काम करत असलेल्या विभाग प्रमुखाकडे परवानगी घेतली जाते. यासाठी लाचलुचपत विभाग संबंधितांकडे परवानगी पत्रांचे आदानप्रदान करतात. चाैकशी संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यास अपसंपदेचा गुन्हा दाखल होते. तसेच लाच घेताना आढळून आल्यावरही कारवाई करण्यात येते.
एक कारवाई लवकरच
दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चाैकशी पूर्ण झालेल्या एकावर लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारवाईनंतर नावाचा खुलासा होणार आहे.
महसूल विभाग राहिला अग्रस्थानी
गेल्या वर्षातील लाचखोरांच्या यादीत महसूल विभाग अग्रभागी राहिला आहे. आता पुढील चाैकशीच्या यादीतही महसूलच अग्रभागी असल्याची माहिती आहे.
लाचलुचपत विभागाने दाखल केलेल्या अर्जांपैकी तीन अर्जांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हे अर्ज नेमके कोणासंदर्भात याची माहिती मिळू शकलेली नाही.
लाच देण्या-घेण्यासंदर्भातील तक्रारी वाढल्यास संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या चाैकशीसाठी येत्या काळातही अर्ज दाखल केले जाणार आहेत.
प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संबंधित विभागाकडे चाैकशीसाठी परवानगी मागितली होती. ती परवानगी मिळाल्यानंतर चाैकशी सुरू आहे. लवकरच कारवाईही होईल.
-शिरीष जाधव,
उपअधीक्षक एसीबी, नंदुरबार