ब्राह्मणपूरी : शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन दिल्यानेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप करीत कुटुंबीयांनी मृतदेह पहाटे तीन वाजेपर्यंत डॉक्टराच्या घराच्या अंगणातच ठेवला. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर २९ रोजी पहाटे तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेला आठवडा उलटला असून, संबंधित बोगस डॉक्टरावरील कारवाई गुलदस्त्यात असून, शल्य चिकित्सक यांच्या अभिप्रायाकडे लक्ष लागून आहे.
२१ ऑगस्ट रोजी सुलतानपूर येथील चेतना डिगंबर पाटील (१६) हिला थंडी-ताप आल्याने, गावातीलच एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी आणले होते. तपासणी केल्यानंतर डॉ.राजेंद्र श्रीपत पाटील यांनी चेतनाच्या कमरेवर इंजेक्शन दिले, परंतु काही वेळातच तिला रिॲक्शन आली. त्यामुळे उपचारासाठी शहादा, नंदुरबार व धुळे येथे नेण्यात आले, पण धुळे येथे उपचार करताना २८ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून डॉ.राजेंद्र पाटील हे पसार झाल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त करीत, त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्याशिवाय अंत्यविधी करणार नाही, असा पवित्रा घेत थेट मृतदेह संबंधित डॉक्टरच्या अंगणात ठेऊन डॉक्टरला अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. चार तास होऊन पोलीस प्रशासन व गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी कुटुंबीयांची समजूत घालून शल्य चिकित्सक यांचा अभिप्राय आल्यावरच, आम्हाला संबंधित डॉक्टरला अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यावर संबंधित बालिकेवर अंतिम संस्कार करण्यात आला, परंतु घटनेला आठ दिवसांहून अधिक काळ झाल्याने शल्य चिकित्सकांचा अभिप्राय आला का नाही...? पोलीस प्रशासनाने संबंधित बोगस डॉक्टरला अटक केली का नाही...? असा तर्कवितर्क लावत कुटुंबातील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित डॉक्टरावरील कारवाई गुलदस्त्यात तर नाही ना, असा प्रश्न सुलतानपूर ग्रामस्थांनीही उपस्थित केला आहे.
बोगस डॉक्टरवर कारवाईची मागणी
एका १६ वर्षीय बालिकेला चुकीच्या पद्धतीने इंजेक्शन देऊन मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडल्याने बोगस डॉक्टरचा प्रश्न ऐरणीवर आला असून, बोगस डॉक्टरामुळे असा कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागला असेल, असा प्रश्न सध्या ग्रामीण भागातील जनतेला आला पडत असल्याने, बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.