नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावठी प्रजातीच्या बैलांना शेती कामांसाठी सर्वाधिक मागणी आहे. यातून पशुपालक बैलांचे संगोपन करून त्यांना तयार करत विक्रीसाठी आणतात. परंतु गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आठवडे बाजार व यात्राेत्सव रद्द करण्यात आल्याने पशुपालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
गुरुकुल नगराकडे जाताना समस्या
नंदुरबार : होळ तर्फे हवेलीतील गुरुकुल नगराकडे जाणाऱ्या नवीन रस्त्यावरील पथदिवे कायम बंद असतात. हे पथदिवे सुरू ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रस्त्यावर रात्री पायी फिरणाऱ्यांची वर्दळ असते. अनेकजण कुटुंबासह येथे दिसून येतात.
घरकूल योजनेचा लाभ देण्याची मागणी
नंदुरबार : तालुक्यातील काही गावांमध्ये १० वर्षांपासून घरकुलाचा लाभ मिळाला नसलेले लाभार्थी समोर आले आहेत. हे लाभार्थी योजनेपासून वंचित असल्याने त्यांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थी तहसील कार्यालय आणि पंचायत समिती याठिकाणी सातत्याने विचारणा करत असल्याचे दिसून आले आहे, परंतु त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
साईडपट्ट्यांची दुरुस्ती रखडल्याने अडचणी
नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान साईडपट्ट्या दुरुस्तीची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. साईडपट्टी दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करूनही कारवाई करण्यात येत नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
मास्क वापराबाबत बेशिस्त कायम
नंदुरबार : जिल्ह्यातील काही भागात मास्क वापराबाबत बेशिस्त सुरु असल्याचे दिसून येत आहे. अद्यापही अनेक जण मास्क वापर करण्याबाबत उदासीन असल्याचे समोर आले आहे. यामुळे कोरोना संसर्गाची भीती आहे. अशांना समज देणे गरजेचे आहे.
गुरुकुल नगराकडे जाताना समस्या
नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या हाॅटेल्स व्यवसाय अर्ध्यावर आले आहेत. यातून चालक व मालकांना आर्थिक फटका बसला असून हाॅटेलमध्ये काम करणारे कारागीर व वेटर यांच्या वेतनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हाॅटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. यातून मार्ग काढत व्यवसाय सुरु झाल्यानंतर पुन्हा लाॅकडाऊनमुळे अडचणी वाढल्या आहेत.
कक्ष सुरु करावेत
नंदुरबार : तापमानात वाढ झाल्याने आरोग्य प्रशासनाने जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयत, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष सुरु करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुपारी १२ ते दोन वाजेदरम्यान उष्णता जाणवत असल्याने अनेकांना त्रास होत आहे.
काटेरी झुडपे काढा
बोरद : तळोदा तालुक्यातील विविध गावांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढत आहेत. यातून चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना अडचणी निर्माण होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी त्या-त्या गावातील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
भूईमुगाचा चारा परजिल्ह्यात रवाना
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात यंदाही उन्हाळी भूईमुगाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होते. भूईमुगाची सध्या काढणी सुरु आहे. दरम्यान काढणी केल्यानंतर भूईमुगाचा चारा शेतकरी विक्री करत आहेत. यातून अनेक जणांनी चारा परजिल्ह्यात रवाना केल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना भूईमुगासोबत चारा विक्रीतून आर्थिक लाभ मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरात राज्यातून प्रवाशांची वाहतूक
नंदुरबार : गुजरात राज्यात जाणाऱ्या व येणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्या असल्या तरी खासगी प्रवासी वाहनांद्वारे प्रवाशांची वाहतूक सुरु आहे. दर दिवशी नंदुरबार शहर व परिसरात या वाहनांमधून प्रवासी येत असल्याचे दिसून आले असल्याने दक्षता घेणे गरजेचे आहे.
रस्त्यांची निर्मिती करण्याची मागणी
नंदुरबार : शहरालगतच्या रहिवासी वसाहतींमध्ये रस्ते निर्मिती करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करुन ही कार्यवाही झालेली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.