बामखेडा : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व व्हीएसजीजीएम मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने मुबारकपूर (रेले), ता.निझर, जि.तापी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी १०३ जणांनी रक्तदान केले. त्यात सहा महिला व ९७ पुरुषांनी आपला सहभाग नोंदविला.
कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने, सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये आणि शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत आणि विविध शहर ग्राम गुजर पाटीदार ग्लोबल मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुबारकपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरदार वल्लभ पटेल यांच्या प्रतिमेला निझर पोलीस निरीक्षक जे.सी. पवार, श्रीपत सजन पटेल, प्रकाश पटेल, उपसरपंच योगेश पटेल, भाजप पदाधिकारी हेमंत पटेल, धीरज पटेल, हितेश पटेल, डॉ.लतेश पटेल यांचे हस्ते फुलाहर अर्पण करून व दीप प्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला, पुरुष, तरुणी, तरुण मित्रमंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शिबिरात पाच जोडप्यांचा सहभाग
शिबिरात गावातील पाच जोडप्यांनी रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला, सुरेश सुदाम पटेल-ज्योतीबाई सुरेश पटेल, हसमुख राजाराम पटेल-मोतनबाई हसमुख पटेल, हितेश जाधव पटेल-कामिनी हितेश पटेल, मयूर मोतीलाल पटेल-हंसा मयूर पटेल, योगेश राजाराम पटेल-मेघा योगेश पटेल यांनी रक्तदान केले. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
दिव्यांग व्यक्ती भानुदास श्रीपद पटेल यांनीही रक्तदान केले.
विविध संघटना आणि व्यक्तींच्या सहभाग
लोकमत, व्हीसीजीजीएम बरोबरच येथील पटेल युवक मंडळ सदस्य, ज्येष्ठ नागरिक मंडळ, ग्रामस्थ व महिला, तसेच चिंचोदा, सरवाळा, म्हसावद, डामरखेडा, निझर, वेळदा येथील व्हीएसजीजीएम सदस्य उपस्थित होते.
नवजीवन ब्लड बँकेचे संचालक डॉ.सुनील चौधरी, रोहिदास जाधव, गजानन चौधरी, उद्धव पाटील, कैलास पटेल, चंद्रकांत दंडगव्हाण, पांडुरंग गवळी यांचे सहकार्य लाभले.