सातपुड्याच्या. डोंगर-दऱ्यात आढळणारी आंबट-गोड करवंदे, जांभळे या गावरान फळांचा सध्या बहर सुरू आहे. यावर्षी हवामान चांगले असल्याने या फळांच्या झाडावर करवंदे-जांभळे प्रचंड प्रमाणात लगडलेली आहेत. लॉकडाऊनमुळे ती तोडायला जायला आणि बाजारपेठे पर्यत न्यायला मोठी अडचण निर्माण झालेली आहे. पश्चिम पट्यातील व सातपुडयातील मांडवी, धडगांव, मोलगी, काठी, घाटली, काकरदा तसेच साक्री तालुक्याातील पिंपळनेर, वार्सा, कुडाशी, नवापूर तालुक्यातील काही भागात काटेरी जाळ्या असून, त्याला करवंदे लगडलेली आहेत.
प्रत्येक वर्षी उन्हाळयाच्या एप्रिल, मे व जून महिन्यात करवंदांना चांगला बहार येतो. कडक उन्हाळा असल्याने शेतीची कामेही नसल्याने अनेक जण ही करवंदे व जांभळे तोडून बाजारात विक्रीसाठी नेऊन सिझनेबल व्यवसाय करून अल्पशी कमाई करत असतात. अनेक जण ही करंवदे, नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर आदी ठिकाणी डोक्यावर पाट्या घेऊन विक्रीसाठी आणतात. तर त्यांचे घरातील कुटुंबीय डोंगरी भागातील रानावनात जाऊन करवंदे-जांभळे तोडून आणण्याचे काम करतात. त्यातून दररोज हजार रूपयांची कमाई होत असते.
सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने तसेच जमावबंदी, संचारबंदी असल्यादने बाजारपेठा, दुकाने, सर्व बंद आहेत. त्यामुळे करवंदाच्या पाट्या घेऊन विक्रीला जाणे बंद झाले आहे. तसेच बाजारपेठेपर्यंत येण्यासाठी वाहतुकीची सर्व साधने, वाहने बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या व्यवसायातून सातपुड्यात काही महिला व बालके मे आणि जून महिन्यात घाट रस्यावर विक्रीसाठी बसत असतात. मात्र आता त्यांच्या व्यवसायावर बंधन आले आहेत.
सध्या दोन महिने या डोंगराच्या मैना व जांभळामुळे मिळणारा व्यवसाय काही अंशी बंद झाला आहे. साक्री तालुक्यात व सातपुड्यात जांभळाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. ते विक्री करणारे लोक लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडले असून, त्यांतचे रोजीरोटीचे उत्पन्न मात्र बुडाले आहे. आंबट-गोड चवीची करवंदे, जाभळे मुबलक झाडावर असूनही खवय्यांना ते मिळणे लॉकडाऊनमुळे दुरापास्त झाले आहे.