प्रत्यक्षादर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्याकडून मालवाहू ट्रक (क्रमांक एच.आर.५८ बी-९०९०) भरधाव वेगात सुरतकडे जात असताना पानबारा गावातील रघुनाथ पेट्रोल पंपासमोरील महामार्गावरून जाताना टेम्पोला कट मारल्याने वाहनचालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक सरळ रस्त्यालगत असलेल्या संजय गावीत यांच्या देवमोगरा हॉटेलजवळील घरात घुसला. हॉटेलमध्ये काम करणारे पती-पत्नी व ट्रकचा सहचालक किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. आपल्या दिशेने ट्रक येत असल्याचे पाहून काहींनी हॉटेलबाहेर पळ काढला. या अपघातात घरातील साहित्य, अँगल, दरवाजे-खिडकी, छत मोडले, कृषीविषयक व संसारोपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून वाहन सोडून पसार झाले. विसरवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघात कसा झाला यासंदर्भात विसरवाडी पोलीस तपास करीत आहे.
भरधाव ट्रक घुसला हॉटेलात, धुळे-सुरत महामार्गावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST