नंदुरबार : जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांची कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी बदली झाली असून त्यांच्या जागी अपंग कल्याण आयुक्त बालाजी मंजुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिशय खडतर परिस्थितीत त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळविले आहे.आयएएस बालाजी मंजुळे यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून ५६ वा रँक मिळविला होता. तेलंगणात जिल्हाधिकारीपदी असतांना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. बालाजी मंजुळे यांचे आई पार्वती आणि वडील दिगंबर मंजुळे परंपरेने चालत आलेले अर्थात दगडफोडण्याचे काम करत होते. रस्त्यावर दगड फोडत असताना एके दिवशी एक लाल दिव्याची गाडी येऊन उभी राहिली. त्यातील अधिकारी ऐटीत खाली उतरले, दोन-चार शब्द बोलले आणि निघून गेला. तेंव्हाच त्यांनी आपल्या मुुलानेही मोठा साहेब व्हावे असे मनोमन ठरविले. ते बालाजी मंजुळे यांनी खरे करून दाखविले. वडार समाजातील ते पहिले आयएएस झाले आहेत.दोन वर्षांपासून ते अपंग कल्याण आयुक्त म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बालाजी मंजुळे यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:06 IST