नंदुरबार : जिल्ह्यातील नागरीकांना गेल्या दाेन वर्षांत मोठा आधार ठरलेले जिल्हा सामान्य रुग्णालयही आता पूर्वपदावर आले आहे. कोरोना नियंत्रणात आला असला तरी संसर्ग होण्याची भीती आहे; परंतु याठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना मात्र याचा विसर पडला असून रुग्णालयात सर्रास नियमांचा भंग होतो आहे.
याबाबत ‘लोकमत’ने पडताळणी केली असता, सकाळच्यावेळी जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल हाेणारे सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही पालन करत नसल्याचे समोर आले. दरम्यान, याठिकाणी थांबून असणारे नातेवाईकही मास्कचा वापर टाळत असल्याचे समोर आले. आरोग्य कर्मचारी मास्कचा वापर करत असले तरी त्यांच्याकडून रुग्णालयात थांबून राहणाऱ्यांना कामावर असलेल्या परिचारिका किंवा इतरांकडून समज देऊनही दुर्लक्ष केले जात आहे.
ओपीडी हाऊसफुल्ल
आजघडीस जिल्ह्यात तसेच शहरात किरकोळ आजारांची साथ सुरू आहे. यातून गोरगरीब नागरिक जिल्हा रुग्णालयात येत आहेत.
केसपेपर काढण्यासह इतर कामकाजांसाठी बाह्यरुग्ण विभागात गर्दी होत असल्याचे दिसून आले.
डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढले
जिल्हा रुग्णालयात सध्या डेंग्यूसदृश ताप व मलेरियाचे रुग्ण उपचारांसाठी दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. टायफाॅईडचेही रुग्ण येथे दाखल झाले होते.
जिल्हा रुग्णालयात होणारी गर्दी ही चिंतेची बाब आहे. याठिकाणी येणारे बहुतांश रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक हे ग्रामीण भागातून येतात. त्यांच्यात अद्यापही योग्य जागृती झालेली नसल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढतो.
कोरोना अद्यापही गेलेला नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या सर्वांनाच मास्कचा वापर सक्तीचा आहे परंतु बऱ्याच वेळा सूचना करून लोक ऐकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. आरोग्य विभागाकडून सतत सूचना केल्या जात आहेत.
-डाॅ. के. डी. सातपुते,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक.
जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आधी केसपेपर काढावा लागतो. याठिकाणी दरदिवशी मोठी गर्दी उसळते. दुपारी १२ वाजेपर्यंत ही गर्दी असते. याठिकाणी मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग टाळले जात असल्याचे समोर आले.
रुग्णालयात फेरफटका मारला असता, बहुतांश ठिकाणी महिला मास्क लावण्याकडे दुर्लक्ष करताना दिसून आल्या. महिलांकडे मास्कही नसल्याचे समोर आले. रुग्णालयाने या महिलांना मास्क देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.