लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सातपुडा परिसर व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण यांना जोडणारा महत्वाचा रस्ता अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी खराब झाला आहे. हा रस्ता अद्याप दुरुस्त झाला नाही, त्यामुळे परिवहन महामंडळाची बंद करण्यात आली असून दुर्गम भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हा रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष लागून आहे.सातपुडय़ातील नागरिकांना जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी काकरदा ता.धडगाव व डाब ता.अक्कलकुवा मार्गे दोन रस्ते होतेच परंतु ते त्यांच्यासाठी खर्चिक व वेळखाऊ ठरत होते. त्यावर उपाय म्हणून चांदसैलीमार्गे धडगाव ते तळोदा हा अत्यंत सोयीस्कर मार्ग काढण्यात आला. हा मार्ग सुखरुप प्रवासासाठी अवघडच, तरीही दुर्गम भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी वाहतुक सुरू करण्यात आली. त्यात प्रवासी वाहतुक करणा:या खाजगी वाहनांसह परिवहन महामंडळामार्फत देखील मिनी बसच्या माध्यमातून वाहतुक सेवेला सुरुवात करण्यात आली. या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीतून रडत-खडत का असेना सेवा सुरू असतानाच यंदाच्या अतिवृष्टीमुळे हा रस्ता ठिकठिकाणी तुटला. त्यात धडगावच्या बाजूने चांदसैली माता मंदिराजवळ व उखळीआंबा गावाजवळ नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे परिवहन महामंडळामार्फत चारही बसफे:या बंद करण्यात आल्या, परिणामी अवघ्या सातपुडय़ातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तुटलेला रस्ता तातडीने दुरुस्त करुन एस.टी. बससेवा सुरू करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
चांदसैली रस्ता दुरुस्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 12:31 IST