भूषण रामराजेलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील म्हसावद या सधन गावाचे सरपंचपद भूषवणा-या अक्काबाई रमेश ठाकरे ह्या अत्यंत साधारण अशा कुटूंबातून पुढे आल्या आहेत. अवघ्या २४ वर्ष वयात त्यांनी ही जबाबदारी घेत मार्गक्रमण केले होते. गावातील वरिष्ठांचा सल्ला घेत त्या ग्रामपंचायतीचे कामकाज करत आहेत. युवा म्हणून गावासह संपूर्ण जिल्ह्यातील युवती आणि महिलांसाठी त्या प्रेरणा आहेत. कुटूंबाचा सांभाळ करत त्यांची वाटचाल सुरु आहे.
लोकनियुक्त सरपंच असल्याने आपल्याला ग्रामपंचायतीत जावेच लागेल याची त्यांना जाणीव होती. यातून मग अनेक बाबींचा अभ्यास त्यांनी करुन घेतला. गावासाठीच्या योजना, पेसा कायदा, वित्त आयोग, केंद्राच्या योजना, घरकुल, महिलांच्या योजना, ग्रामस्वच्छता अभियान तसेच गाव विकासाच्या इतर योजनांची माहिती त्यांनी पती रमेश ठाकरे तसेच गावातील ज्येष्ठ, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच तालुक्यातील अधिकारी वर्गांकडून जाणून घेतली. यातून त्या गावासाठी कोणत्या योजना आणता येतील, विकास कसा होईल याबाबत सतत सदस्य व ज्येष्ठांसोबत चर्चा करत आहेत. सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत अक्काबाई ह्या ग्रामपंचायत कार्यालयात थांबून असतात. घरी गेल्यावरही गावातील कोणी समस्या घेवून आल्यास त्याच्याकडे लक्ष देतात. अक्काबाई ठाकरे यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले असल्याने त्या साक्षर आहेत. यातून गावात होणा-या विकास कामांची पाहणी करण्यासह नव्या योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करतात. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना पती, मुलगा व सासरे यांच्याकडे लक्ष देत स्वत: सर्व घर सांभाळतात. साधारण अशा घरात राहून उदरनिर्वाहला मोलमजूरी करुनही केवळ समाजकार्याची आवड असल्याने तीन वर्षांपूर्वी निवडणूकीत सहभाग घेतला. यातून जिल्ह्यातील पहिली महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान अक्काबाई ठाकरे यांना मिळाला. हा सन्मान मिळवल्यानंतर त्या धडाडीने गावातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
म्हसावद या गावाला राष्ट्रीय पातळीवर न्यायचे आहे. गावातील विकास कामांचा वेग वाढवयाचा आहे. गावात रस्ते, पिण्याचे स्वच्छ पाणी व सांडपाणी निर्मुलनासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. महिला सरपंच असल्याचा न्यूनगंड कधीही बाळगला नाही. ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्य हे वेळोवेळी मार्गदर्शन करुन त्यांच्या समस्या सांगतात. त्यावर कामकाज करुन त्या सोडवण्याचा प्रयत्न करते. वेळप्रसंगी तालुका व जिल्हा प्रशासनातील अधिका-यांना माहिती दिली जाते. -अक्काबाई ठाकरे, सरपंच. म्हसावद ता. शहादा