लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुळबाळ होत नाही म्हणून २२ वर्षीय विवाहितेला शेतात घेऊन जात पतीसह सात जणांनी किटकनाशक पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगाव, ता.नंदुरबार येथे घडली. याप्रकरणी नगाव येथील सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मनिषा दिलीप सूर्यवंशी (२२) रा.नगाव असे पिढीत महिलेचे नाव आहे. तर दिलीप वेडू सूर्यवंशी, वेडू महारू सूर्यवंशी, कमलाबाई वेडू सूर्यवंशी, कृष्णा वेडू सूर्यवंशी, ज्योती कृष्णा सूर्यवंशी, अशोक वेडू सूर्यवंशी, सुरेखा बंडू सूर्यवंशी सर्व रा.नगाव, ता.नंदुरबार असे संशयीतांची नावे आहेत.पोलीस सूत्रांनुसार, विवाहिता मनिषाबाई यांना मुलबाळ होत नाही म्हणून वेळोवेळी छळ केला जात होता. त्यातूनच त्यांना २६ आॅगस्ट रोजी नगाव शिवारातील त्यांच्या शेतात नेण्यात आले. तेथे पतीसह सात जणांनी संगनमत करून त्यांना किटकनाशक पाजले. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळे येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे मनिषाबाई यांनी पोलिसांना जबाब दिला तसेच फिर्याद दिल्याने पतीसह सासरे, सासू यांच्यासह सात जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. तपास पोलीस निरिक्षक अरविंद पाटील करीत आहे.
किटकनाशक पाजून विवाहितेला ठार मारण्याचा केला प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:42 IST