लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : औरंगाबाद-शहादा बसला झालेल्या अपघातात ठार झालेले एस.टी. चालक मुकेश नगीन पाटील यांच्या कुटुंबीयांना शहादा आगारातील कर्मचा:यांनी एक लाख रुपये मदतनिधी गोळा करून पाटील यांच्या मुलाच्या नावाने मुदतठेव पावती आगार प्रमुख योगेश लिंगायत यांच्या हस्ते देण्यात आली.18 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-शहादा या बसला शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावाजवळ अपघात झाला होता. या अपघातात बसचे चालक मुकेश नगीन पाटील (36) यांच्यासह 12 जणांचा मृत्यृ झाला होता. दोंडाईचाकडे भरधाव वेगात जाणा:या कंटेनर व एस.टी. बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला होता. बसचालक मुकेश पाटील यांच्या मृत्युमुळे घरातील कर्ता माणूस गेल्याने पत्नी व लहान मुलगा व मुलगी उघडय़ावर आले आहेत. शहादा आगार प्रमुख योगेश लिंगायत यांनी आगारातील अभियांत्रिकी, चालक-वाहक, सफाई कामगार यांना मदतनिधी देण्याचे आवाहन केले. त्यानुसार एक लाख रुपये सहायता निधी गोळा झाल्यानंतर त्याची मुदतठेव पावती चालक पाटील यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.
बस अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:10 IST