लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर परिसरात बिबटय़ाच्या मुक्त वावरामुळे शेतकरी व मजूरवर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. या बिबटय़ाने रखवालदाराचे कुत्रे फस्त केले असून, सेलिनपूर येथील प्रकाश वंजारी या युवकाचाही बिबटय़ाने पाठलाग केला असता सुदैवाने तो बचावला आहे. परिसरातील बिबटय़ाचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने त्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या तीन दिवसापासून प्रतापपूर परिसरात बिबटय़ाचा मुक्तसंचार सुरू असल्याचे आढळून आले आहे. याबाबत असे की, प्रतापपूर शिवारातील जयपाल भटेसिंग गिरासे यांच्या केळीच्या शेतात मजूर खताची मात्रा देत असतांना त्यांना बिबटय़ा दिसल्याने तेथून पळ काढला तर रांझणी शिवारात तळोदा-प्रतापपूर रस्त्यावर भालचंद्र पाटील यांच्या शेताच्या बांधावर कृणाल जोहरी व दीपक कोळी या युवकांना बिबटय़ा आढळून आला. तसेच सेलिंगपूर येथील प्रकाश वंजारी हा युवक तळोदा येथे दुध देण्यासाठी जात असतांना त्यास सेलिंगपूर-प्रतापपूर मार्गावर 13 रोजी पहाटे साडेपाच वाजता बिबटय़ा आढळून आला. या वेळी बिबटय़ाने त्यांचा पाठलाग केला असता त्याने लागलीच गावाकडे वेगात मोटारसायकल नेल्याने त्याचा जीव वाचल्याचे सांगितले. या दरम्यान त्याचा दुधाचा कॅन पडल्याने दुधाचेही नुकसान झाले. त्यामुळे या परिसरातील बिबटय़ाचा वाढता वावर लक्षात घेता संबंधित वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी या परिसरात पिंजरा लावून त्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गेल्या तीन दिवसापासून ठिकठिकाणी बिबटय़ा आढळून आल्याने मेवासी वनविभागचे उपवनसंरक्षक अनिल थोरात यांच्या संपर्क साधला असता त्यांनी शनिवारी कर्मचा:यांना पाठविले असता कर्मचा:यांना ठिकठिकाणी बिबटय़ाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने या परिसरात दोन ते तीन बिबटय़ांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कर्मचा:यांनी ठिकठिकाणी मिरची पुडची धुरळणी करीत फटाके फोडले असून, ग्रामस्थांमध्ये याबाबत जनजागृती करीत असून, कोणाला बिबटय़ा आढळून आल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले.
प्रतापपूर परिसरात बिबटय़ामुळे भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:56 IST