लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून जिल्ह्यात १७ बँकांच्या शाखा सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यात चार पोस्ट पेमेंट बँका, दोन खाजगी तर ११ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा आहेत. खासदार डाॅ. हीना गावीत यांनी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने या बँकांना मंजूरी मिळाली आहे. दरम्यान नवीन शाखांमुळे दुर्गम भागातील नागरिकांसह ग्रामीण जनतेच्या बँकेबाबतच्या समस्या सुटणार आहे.. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार स्टेट लेव्हल बँक कमिटीने या १७ बँक शाखा उघडण्यासाठी मान्यता दिली आहे. राज्यात सहा हजार खातेधारकांमागे एक बँक आहे. नंदुरबार जिल्ह्यात हे प्रमाण २१ हजार असल्याचे समाेर आले होते. सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यात ३५ हजार १२३ तर धडगांव तालुक्यात ६५ हजार खातेदारांची एक बँक शाखा असल्याचे समोर आले हाेते. यातून नागरीकांचे हाल सुरु होते. याकडे लक्ष वेधून खासदार डाॅ. हीना गावीत यांनी पाठपुरावा केल्याने धडगांव, अक्कलकुवा, नवापुर, तळोदा, शहादा, नंदुरबार येथे १६ बँकाच्या शाखा उघडण्यास मंजुरी मिळाली आहे. धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांसाठी सात बँकांच्या तर तळोदा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अमोणी येथे एक बँक शाखेस मंजूरी मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. खासदार डाॅ. गावीत यांच्या पाठपुराव्याचे नागरीकांकडून काैतूक करण्यात येत आहे.
खासदार डाॅ. गावीत यांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील कोठली, शहादा तालुक्यातील कन्साई, कहाटूळ, तोरखेडा येथे पोस्ट पेमेंट बँक, मोहिदे तर्फे शहादा येथे पंजाब नॅशनल बँक, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथे पंजाब नॅशनल बँक, मक्राणीफळीत कॅनरा बँक, डाब येथे युनियन बँक ऑफ इंडिया, धडगाव तालुक्यातील रोषमाळ येथे युनियन बँक ऑफ इंडिया, गोरंबा येथे पंजाब नॅशनल बँक, घाटली येथे कॅनरा बँक, वडळ्या येथे बँक ऑफ इंडिया, कात्री येथे आयसीआयसीआय बँक, तळोदा तालुक्यातील अमोनी येथे कॅनरा बँक, नवापूर तालुक्यातील नवागाव येथे युनियन बँक ऑफ इंडिया, मोग्राणी येथे बँक ऑफ इंडिया तर हळदाणी येथे ॲक्सिस बँकेचा समावेश आहे.