नंदुरबार : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहितेसंदर्भात विधानसभा मतदार संघात तीन स्थिर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आले आहेत.भरारी पथकामार्फत पैसे किंवा भेटवस्तू वाटप, दारू वाटप, विनापरवानगी जाहिरात फलक लावणे, विनापरवानगी गाड्यांचा ताफा, प्रचारासाठी उपयोगात आणणे, पेड न्यूज, खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण, मतदानाच्या दिवशी मतदारांची वाहतूक, मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रचार करणे, प्रतिबंधित वेळेत प्रचार करणे, ध्वनीक्षेपकाचा रात्री १० ते सकाळी सहा दरम्यान उपयोग, मुद्रक, प्रकाशकाची माहिती न देता पोस्टर्स मुद्रीत करणे, जाहीरसभांसाठी नागरिकांची वाहतूक आदी बाबींवर लक्ष देण्यात येणार आहे.शहादा, अक्कलकुवा, नवापूर विधानसभा मतदार संघात प्रत्येकी चार तर नंदुरबार विधानसभा मतदार संघात सहा भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकामार्फत आचारसंहितेबाबतच्या घटनांचे चित्रिकरण करण्यात येणार आहे.स्थीर सर्वेक्षण पथकात एक कार्यकारी दंडाधिकारी आणि तीन ते चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकामार्फत रोख रक्कम, दारू, संशयीत वस्तू किंवा शस्त्रे आदींच्या वाहतुकींवर लक्ष देण्यासाठी चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकामार्फत आचारसंहिता भंगाची घटना आढळताच तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात सहाय्यक खर्च निरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना सहाय्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च निरीक्षक निवडणूक खर्चाबाबत येणाºया सर्व तक्रारी संदर्भात कारवाई करतील. माध्यम प्रमाणिकरण आणि नियंत्रण समिती सोबत समन्वय साधून हे निरीक्षक खर्चाबाबत दैनंदिन अहवाल सादर करतील. प्रत्येक उमेदवाराकडून खर्चाची नोंद होत असल्याबाबत खर्च निरीक्षकांचे लक्ष राहणार आहे.आचारसंहिता अंमलबजावणी साठी लेखा पथक, व्हीडीओ पाहणी पथक, अवैध दारू विक्री विरोधात भरारी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक आदींची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजुळे यांनी दिली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय भरारी पथकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:19 IST