लोकमत न्यूज नेटवर्कम्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या बेवारस मोटारसायकली पोलीस ठाण्याच्या आवारात जमा केल्या आहेत. या मोटारसायकलींची ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन म्हसावद पोलिसांनी केले आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाणेअंतर्गत अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन ते चार वर्षात २६ बेवारस मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. या मोटारसायकली या म्हसावद पोलीस ठाण्याच्या आवारात जमा आहेत. ज्याच्या मालकीच्या या मोटारसायकली असतील त्यांनी त्या ओळखून दहा दिवसाच्या आत संबंधित वाहनांची मूळ कागदपत्रे आणून ओळख पटवून ताब्यात घेण्याचे आवाहन म्हसावद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण पवार, फौजदार देवीदास सोनवणे, सहायक फौजदार किशोर बडगुजर यांनी केले आहे. संबंधित वाहनांची निर्धारित कालावधीत ओळख न पटल्यास किंवा कोणत्याही प्रकारची कागदपत्रे प्राप्त न झाल्यास न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करून लिलाव करण्यात येईल, असे पोलिसांनी कळविले आहे.
बेवारस मोटारसायकलींबाबत म्हसावद पोलिसांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:36 IST