कोरोना महामारीमुळे १० महिन्यांपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वर्षीचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेतले. परंतु ते परिणामकारक ठरले नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने राज्य शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील दहावी व बारावीचे वर्ग २८ नोव्हेंबरपासून तर शहरी भागातील वर्ग १० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या दहावी व बारावीचे वर्ग शाळांमध्ये सुरू आहेत. शिक्षण विभागाने दोन्ही वर्गाचा अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परंतु निश्चित केलेल्या वेळेत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल की नाही याची खात्री वाटत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे .
दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काठिण्य पातळीवरील काही गद्य व पद्य कमी करण्यात आले आहेत. काही ऐतिहासिक संदर्भाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न वगळण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सर्वच विषयांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याने एकप्रकारे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी उर्वरित अभ्यासक्रम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण करून पुन्हा विद्यार्थ्यांकडून सराव करून घेण्याची तारेवरची कसरत शिक्षकांना करावी लागणार आहे. त्यामुळे एकीकडे विद्यार्थी-पालक अभ्यासक्रम ठरावीक वेळेत पूर्ण होतो का? याबाबत चिंतीत असताना तो पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
अभ्यासक्रमात कपात करूनही अडचणी कायम
दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा विद्यार्थ्यांनाही अध्ययन करणे सोपे जावे यासाठी राज्य शासनाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला. अभ्यासक्रम कमी करण्यात आल्याने शाळांना दिलासा मिळाला आहे. बारावीचा अभ्यासक्रमही कमी करण्यात आला आहे. जवळपास २५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत. हा वगळलेला भाग सोडून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.