या वेळी दिव्यशक्ती महिला प्रभात संघांतर्गत येणाऱ्या एकूण नऊ गावांतील नऊ ग्राम संघातील २७० महिला या सभेस उपस्थित होत्या. सभेचे उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा शहादा पंचायत समिती सभापती बायजाबाई भील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लोणखेड्याच्या सरपंच शांताबाई भील, माजी उपसरपंच अशोक पाटील, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक राधाकृष्ण गायतोंडे, बँक ऑफ महाराष्ट्र, तालुका व्यवस्थापक ईश्वर जमदाडे, सागर सनेर, वॉटर ओ.आर.जी.चे जिल्हा समन्वयक सागर सनेर, योगेश पाटील, किशोर बिरारे, अशोक साळवे, कुणाल कानडे, अध्यक्ष रेणुका रणदिवे, प्रभाग संघ सचिव राजश्री पटेल, खजिनदार सविता मराठे उपस्थित होते.
प्रास्ताविकातून योगेश पाटील यांनी शहादा तालुक्यात गटाच्या माध्यमातून ३७ हजार कुटुंबांपर्यंत काम सुरू आहे. तालुक्यातील एकूण १३ प्रभात संघाची दर वर्षाला प्रभागनिहाय वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
ईश्वर जमदाडे यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना व गटांना मिळणारे लाभ यावर मार्गदर्शन केले. सभेत उपस्थित बँक ऑफ महाराष्ट्र शाखा प्रबंधक गायतोंडे यांनी महिलांना आर्थिक साक्षरता व स्वयंसाहाय्यता गटाच्या माध्यमातून आपण लघू उद्योग स्थापन करावे तसेच यासाठी आपणास आपल्या बचतीच्या सहापट बँक अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. सागर सनेर यांनी स्वच्छतेमध्ये आर्थिक समावेशनावर माहिती दिली. तर अशोक साळवे यांनी महिलांना विविध विमा योजना व त्याचे स्वरूप व फायदे याबाबत माहिती देऊन जास्तीतजास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कुणाल कानडे यांनी महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना ऑनलाइन स्वरूपात बाजारपेठ उपलब्ध करून देणे व लेबल पॅकिंग आणि मार्केटिंग यासंदर्भात मार्गदर्शन केले.
राजश्री पाटील व रेणुका रणदिवे यांनी प्रभात संघाच्या वार्षिक लेखाजोख्याचे वाचन केले. महिला बचत गटात येऊन माझ्या जीवनात किती बदल झाले यासंबंधी महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात १० महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले होते.
सूत्रसंचालन ललिता पाटील यांनी केले तर आभार प्रभाग समन्वयक सुचिता सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी प्रभात संघातील सर्व आय.सी.आर.पी. व महिलांनी परिश्रम घेतले.