जितेंद्र गिरासे ।लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने कृषी सेवा केंद्र अत्यावश्यक सेवेप्रमाणेच सुरू ठेवावे, असे प्रशासन भूमिका घेत असली तरी सारंगखेड्यात मात्र मंगळवारी त्याचा उलटा अनुभव आला. कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा दौरा या भागातून जाणार असल्याने त्यांचा धसका घेऊन येथील कृषी सेवा केंद्र चालकांनी तब्बल सहा तास दुकाने बंद ठेवली होती. मंत्र्यांचा ताफा परतताच मात्र दुकाने पूर्ववत सुरू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.कृषीमंत्री दादाजी भुसे हे मंगळवारी धुळे येथून सारंगखेडामार्गे कहाटूळ येथे जाणार होते. मंत्री भुसे हे सारंगखेडामार्गे जाणार असल्याची माहिती कळाल्यावर येथील रासायनिक खते व बी-बियाणे विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्याने त्याबाबत दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती. कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी काही दिवसांपूर्वी साध्या वेशात व मोटारसायकलीने जात काही ठिकाणी रासायनिक खते विक्रीच्या दुकानांना भेटी देत शेतकऱ्यांना खते न देणाºया विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मंगळवारी मंत्री भुसे हे सारंगखेडामार्गे मोटारीने कहाटूळ येथे जाणार होते. ते कदाचित येऊन आपल्या दुकानाची तपासणी करतील की काय या धास्तीमुळे तर येथील रासायनिक खत विक्रेते व बी-बियाणे विक्रेत्यांनी दुपारी दोन वाजताच दुकाने बंद केली नाहीत ना? अशी चर्चा येथे दिवसभर होती.कोरोना विषाणू संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सध्या जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर ही चार प्रमुख शहरे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. मात्र या चारही ठिकाणी सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. तसा निर्णय ग्रामपंचायत हद्दीत नसतानादेखील मंगळवारी नेमका राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या दौºयामुळे दुकाने बंद असल्याबाबत विविध चर्चांना उधाण आले होते. यात दुकाने बंद करण्याबाबत नेमकी कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दुकानदारांना सूचना केली की दुकानदारांनी स्वत:हून आपली दुकाने बंद केली याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. दुकाने बंद असल्याने अनेक शेतकरी दुकानांसमोर उभे असल्याचे चित्र या वेळी पहावयास मिळाले.दरम्यान, कृषीमंत्री दादाजी भुसे यांचा ताफा परतताच येथील कृषी सेवा केंद्र पूर्ववत सुरू झाल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला.
...आणि मंत्र्यांचा ताफा जाताच दुकाने खुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 13:10 IST