तळोदा : येथील मेवासी वनविभागाकडून पुढील महिन्यात घेण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेसाठी आपल्या वनक्षेत्रात साडेचार लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्याचे नियोजन करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या़करिता १२ नर्सऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. येथील मेवासी वनविभागाकडून दरवर्षी आपल्या वनक्षेत्रात पुढील महिन्यात म्हणजे १ ते १५ जुलैदरम्यान वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली जाते. यंदाही या विभागाने तळोदा, अक्कलकुवा, खापर, मोलगी, काठी व वडफळी अशा सहा रेंजमध्ये साधारण चार लाख ५४ हजार ३०० विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. यात राज्य योजनेतून १२० हेक्टरवर दोन लाख ५० हजार ३०० तर जिल्हा योजनेतून १३५ हेक्टरवर दोन लाख पाच हजार अशा नियोजनाचा समावेश आहे.
वृक्षलागवड मोहिमेकरिता यंत्रणांनी उन्हाळ्यातच रोजगार हमी योजनेतून मजुरांमार्फत वनक्षेत्रात खड्डे खोदले आहेत. त्यामुळे वनविभाग वृक्षलागवडीच्या जय्यत तयारीत आहे. यासाठी सहाही रेंजमध्ये १२ नर्सऱ्या उभारण्यात आलेल्या आहेत. मुख्यतः बांबू, आवळा, चिंच, निंब, बेहडा ही रोपे मोठ्या प्रमाणावर लावण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, यंदा वन औषधी व आदिवासींना रोजगारासाठी महत्त्वाची असलेली महू फुलाचे रोपेही यंदा लावण्यात येणार आहे. गेल्या वर्षी या वृक्षाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता. तथापि वृक्ष लागवड मोहिमेकरिता लागणारी आर्थिक नियोजनाबाबत दोन रेंज वगळता इतरांनी अजून, निधीचा प्रस्ताव मेवसी वन कार्यालयाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे निधीची पुढील कार्यवाही वरिष्ठांकडे करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. संबंधित वन क्षेत्रपाल यांच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
यंदाही शासनाचा वन महोत्सव
गेल्या वर्षी शासनाने वन विभागामार्फत वन महोत्सव साजरा केला होता. त्याला चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळाल्याने यंदाही शासनातर्फे १५ जून ते ३० सप्टेंबर या दरम्यान वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक रस्त्याचा दुतर्फा, मोकळ्या जागा, शेताच्या बांधावर, विविध कार्यालयांच्या आवारात वृक्षारोपण करण्याचे सूचित केले आहे. या महोत्सवात शासकीय, निमशासकीय यंत्रणा, आस्थापना, समाजसेवी संस्था यांच्या सहभाग घ्यावा. त्यांना वृक्षलागवडीकरिता सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आली आहे. शासन वृक्षलागवड मोहीम राबवून निसर्ग संपत्ती वाढविण्यावर प्रामाणिक, ठोस प्रयत्न करीत असले, तरी त्यातील किती प्रत्यक्ष वाढलेत, याचेही ऑडिट झाले पाहिजे, तरच योजनेचा उद्देश सफल होईल, शिवाय त्यावर केलेला खर्चही उपयोगी ठरेल, अशी वृक्षप्रेमी जनतेची अपेक्षा आहे.
तळोदा मेवासी वनविभागाच्या सहा वनक्षेत्रात यंदा साधारण साडेचार लाख वेगवेगळ्या प्रजातीची रोपे लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी नर्सरीमधील रोपेही तयार आहेत.
- पी.के. बागुल, उप वनसंरक्षक, मेवासी वन कार्यालय, तळोदा.