महिन्याच्या विश्रांतीनंतर जयनगरसह परिसरात पाऊस,
खरीप पिकांना जीवदान
जयनगर : जिल्ह्यासह जयनगर परिसरात जवळपास महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरीराजा सुखावला असून आता पुन्हा पिकांना रासायनिक खते द्यायला तसेच औषधफवारणी कामांना वेग येणार आहे. त्यामुळे मजूरवर्गालाही रोजगार मिळणार आहे. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी दोन-अडीच वाजेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली होती. रात्रीही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा सर्वच घटकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
सलग दोन वर्षे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे जमिनीतील पाणीपातळीत वाढ झाली होती. मात्र, मागील दोन महिन्यांत अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी व लागवड केली होती. जिल्ह्यात कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, मुगाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जवळपास महिनाभरापासून पावसाच्या विश्रांतीमुळे पिके करपू लागली होती. मात्र, मंगळवारी दुपारी सर्वत्र दोन वाजेच्या सुमारास कमी-अधिक प्रमाणात रिमझिम तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी पिके धरून ठेवत होती. मात्र, आलेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले असले, तरी उत्पादनात निश्चितच घट होणार आहे.
रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी पाऊस लांबल्याने यापुढे सरासरीएवढा पाऊस झाला, तरच विहिरी तसेच कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते.
जयनगरसह परिसरात अद्याप नद्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे परिसरातील विहिरींना तसेच कूपनलिकांना पाणीपातळीत वाढ दिसून येत नाहीय. म्हणून आगामी दीड महिन्याच्या पावसावर शेतकऱ्यांचे खरीप तसेच रब्बी हंगामाचे भवितव्य अवलंबून आहे.