शहादा : तालुक्यातील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, ससदे या तीन ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसाठी एकूण ७३ टक्के मतदान झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. समोरासमोर झालेल्या लढतीतील गटाकडून विजयाचे दावे केले जात आहे. मतदानप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, सुलतानपूर व ससदे यातीन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदासाठी व सदस्यांसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली होती. दरम्यान सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ७३ टक्के मतदान झालेले आहे. मतदान दरम्यान ब्राह्मणपूरी येथे एका विवाह सोहळा दरम्यान वराने मतदानाचा हक्क बजावला आहे. ग्रामपंचायतीच्या मतदानाप्रसंगी कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे मतदान पूर्णपणे शांततेत झाले आहे. सुलतानपूर व ससदे या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच पदासाठी तिरंगी लढत झालेली आहे.ससदे ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी निवडणूक होती. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या माघारीच्या दिवशी सात उमेदवार अगोदरच बिनविरोध झालेले आहेत उर्वरित दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. यात ग्रामपंचायतीची निवडणूक मतमोजणी सोमवारी सकाळी दहा वाजेला तहसील कार्यालय आवारात होणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
शहादा तालुक्यातील तीन ग्रामपंचायत निवडणुकींसाठी ७३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 12:17 IST