नवापूर शहरातील ४ पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने किलिंग ऑपरेशन सुरू झाले असून आज दिवसभरात नवापूर येथील डायमंड पोल्ट्रीमधील ४० हजार पक्ष्यांना नष्ट करण्यात आले आहे. यात नंदुरबार येथील पशुसंवर्धन विभागातील १२ पथके, जळगाव जिल्ह्यातील ८ पथकाने कामगिरी केली. रात्री वासिम पोल्ट्रीमधून ३८ हजार २०० कोंबड्या नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी पशुसंवर्धन विभागाचे २०० कर्मचारी सहभागी होणार आहेत. उद्या या मोहिमेत ६०० कर्मचारी सहभागी होणार असल्याने कोंबड्या नष्ट करण्याचा आकडा एक लाखाच्या घरात जाणार आहे. या चारही पोल्ट्रीमधील पक्ष्यांना नष्ट केले जाणार आहे. त्यानंतर लाखो अंडी नष्ट केले जाणार आहेत. अति संसर्गजन्य क्षेत्रातील पाच लाख कोंबड्या अगोदर नष्ट केल्या जातील. त्यानंतर इतर कोंबड्या नष्ट केल्या जातील. नाशिक विभागाचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र सिंग, नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी रघुनाथ गांवडे, प्रांताधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या दिवशी ४० हजार कोंबड्या केल्या नष्ट, बर्ड फ्लूमुळे ३० कोटींच्या नुकसानीचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST