लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : शिक्षण विभाग पंचायत समिती नवापूर व नवापूर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४१ व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष हरीश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध गटातून १३७ उपकरणे मांडण्यात आले आहेत. शुक्रवारी या प्रदर्शनातील विजेते उपकरण मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव होऊन समारोप होणार आहे.अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी आर.बी. चौरे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी आर.बी. पवार, डाएटचे गिरीश गावीत, गोपाळ पवार, मिलिंद वाघ, सुनील भामरे, विनय गावीत, डी.के. बोरसे, संजय जाधव, रवींद्र वाघ, दिनेश बिरारीस, सुदाम वसावे, महेंदद्र वळवी, किशोर रायते, राकेश देसले, हेमराज सावळे, मंगला पाटील, सुनीता अमृतसागर, धर्मेंद्र वाघ, विजय पाटील, चंद्रकांत गावीत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.हरीश अग्रवाल म्हणाले की, जगाच्या पाठीवर संशोधनाच्या बाबतीत देशाचे भरीव योगदान असून विज्ञानाच्या अविष्कारामुळे देश प्रगतीच्या वाटेवर आहे. विद्यार्थ्यांनी समाजातील सर्व घटकांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी. दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञानानेच मानवी जीवन सुकर झाले आहे. लहान सहान घटनांचाही वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करुन तो विचार प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केल्यास संशोधन प्रवृती निर्माण होऊन नवनव्या शोधांचा जन्म होईल. त्यासाठी विज्ञान प्रदर्शने, विज्ञान मेळावे, विज्ञान संम्मेलने प्रेरणादायी ठरतात, असे शिक्षण विस्तार अधिकारी चौरे म्हणाले.परीक्षक म्हणून डॉ.मंदा गावीत, सुनील बोरसे, डॉ.एस.डी. पाटील, आर.आर. पाठक, डॉ.एस.बी. महाजन, आनंद पाटील, के.एस. पाटील, एन.पी. पाटील आदींनी काम पाहिले.प्रास्ताविक सुनील भामरे यांनी केले. सूत्रसंचालन राकेश पाटील तर आभार सार्वजनिक हायस्कूलचे प्राचार्य मिलिंद वाघ यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनय गावीत, मुख्याध्यापक संघाचे सचिव सुनील भामरे, अध्यक्ष मिलिंद वाघ, प्रवक्ता गोपाळ पवार, कोषाध्यक्ष संजय जाधव, सहसचिव दिनेश बिरारीस, उपाध्यक्ष रवींद्र वाघ तथा सर्व शाळेतील मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक यांनी परिश्रम घेतले. ३ जानेवारीला समारोपासह बक्षीस वितरण आयोजित करण्यात आले आहे.शालेय विद्यार्थ्यांनी आरोग्य, पाणी व्यवस्थापन, शाश्वत कृषी पद्धती, औद्योगिक विकास, परिवहन आणि दूरसंचार, शैक्षणिक खेळ, गणितीय खेळ आदी विषयांवरील प्रतिकृती तयार करून प्रदर्शनात मांडल्या. त्यात जिल्हा परिषद शाळा पहिली ते पाचवी २३, प्राथमिक गट खुला २८, प्राथमिक गट राखीव नऊ, माध्यमिक गट खुला ३६, माध्यमिक राखीव १२, शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य प्राथमिक १५, माध्यमिक चार, लोकसंख्या प्राथमिक तीन, माध्यमिक एक व प्रयोगशाळा परिचर गटातून दोन अशी एकूण १३७ उपकरणे मांडण्यात आली आहेत.
विज्ञान प्रदर्शनात १३७ उपकरणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:48 IST