नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद येथील जिल्हा परिषद शाळेतील डिजीटल वर्गाचे कडी-कोयंडे तोडत २५ हजार रुपयांची संगणक साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली़चोरट्यांनी सध्या शाळांच्या डिजीटल वर्गाकडे आपला मोर्चा वळवला असून शाळांना सुटी असल्याची संधी साधल्याचे बोलले जात आहे़ पिंपळोद जिल्हा परिषद शाळेत अज्ञात चोरट्यांनी लोखंडी दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला़ डिजीटल वर्गातील दोन संगणक सीपीयु, दोन मॉनिटर व दोन कीबोर्ड असा साधारणत: २५ हजार रुपये किंमतीची साहित्य चोरुन पळ काढला़सोमवारी सकाळी चोरीची घटना शाळा प्रशासनाच्या लक्षात आल्यावर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात याबाबत शाळेचे मुख्याध्यापक शेख आसिफ शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट देऊन पाहणी करण्यात आली़ पुढील तपास हवालदार असई वळवी करीत आहेत़
वर्गातून २५ हजारांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:22 IST