नंदुरबार : मतदार संघातील 211 मतदान केंद्रात संपुर्ण प्रक्रियेचे थेट व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून ते थेट दिल्लीत बसूनही निवडणूक आयोगाला पहाता येणार आहे. याशिवाय सात मतदान केंद्र हे ऑल वूमन बुथ राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिली. निवडणुकीची अधिसुचना जाहीर झाल्यानंतर एकुण प्रक्रिया आणि प्रशासनाच्या तयारीविषयी माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुधीर खांदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी मंजुळे यांनी सांगितले, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. इंटरनेट कनेक्टीव्हिटी असलेल्या 211 मतदान केंद्रातून प्रक्रियेचे थेट प्रेक्षेपण केले जाणार आहे.सात मतदान केंद्र हे संपुर्ण महिला वर्ग सांभाळणार आहेत. त्यात मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान अधिकारी, शिपाई, बंदोबस्तासाठी महिला पोलीस कर्मचारी राहणार आहेत. या मतदान केंद्रांमध्ये अक्कलकुव्यातून गंगापूर, शहादातून शहादा शहरातील 177 क्रमांकाचे, नंदुरबारातून नंदुरबार शहरातील 353 क्रमांकाचे, नवापूरमधून नवापूर शहरातील 192 क्रमांकाचे, साक्रीमधून साक्री शहरातील 276 क्रमांकाचे व पिंपळनेर तर शिरपूरमधून शिरपूर शहरातील 235 क्रमांकाचे मतदान केंद्राचा समावेश आहे. सहायकारी मतदान केंद्र संख्या वाढल्याने आता एकुण मतदान केंद्रांची संख्या ही 2,115 इतकी झाली आहे. निवडणुकीसाठी एकुण 10 हजार 575 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मंजुळे यांनी दिली.कायदा व सुव्यवस्थानिवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था टिकविण्यासाठी व निर्भयपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या पोलीस बळासह बाहेरून बंदोबस्त मागविण्यात आला आहे. एकुण एक पोलीस अधीक्षक, एक अपर अधीक्षक, पाच उपअधीक्षक, 19 पोलीस निरिक्षक, 85 सहायक व उपनिरिक्षक, 1182 पोलीस कर्मचारी, 742 बाहेरून येणारे कर्मचारी, राज्य व केंद्रीय राखीव पोलीस बलाची तुकडी कार्यरत राहणार आहे. लोकांमध्ये विश्वास व निर्भयपणाचे वातावरण निर्माण करणे हा मुख्य उद्देश राहणार आहे. प्रतिबंधात्मक आदेशान्वये 808 जणांवर कारवाई झाली आहे. 322 जणांना अंतरिम बंधपत्र तर 23 जणांना अंतीम बंधपत्र बजावण्यात आले आहे. 12 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. 452 जणांना अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहेत तर 176 जणांना प्रस्तावीत आहेत. 456 शस्त्र परवाणाधारकांकडून ते जप्त करण्यात आले असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.
211 मतदान केंद्रातून थेट प्रेक्षेपण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:16 IST