लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेंतर्गत तळोदा तालुक्यातील कुष्ठरोगाचे २० तर क्षयरोगाचे १३ रूग्ण आढळून आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी दुर्गम, अतिदुर्गम भागात पायपीट करून परिश्रम घेत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार तळोदा तालुक्यातील विविध गावात क्षयरोग निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणासाठी तालुक्यातील एकूण ११८ आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज गावागावात जाऊन २० ते २५ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन हे पथक सर्वेक्षण करीत आहेत. १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये एक लाख ७२ हजार २९७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी आतापर्यंत एक लाख ७१ हजार ९६७ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये क्षयरोगाचे ५१८ संशयित आढळून आले आहेत. आतापर्यंत १३ जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे तपासणीअंती निदान झाले आहे. त्यांना योग्य औषधोपचार सुरू करण्यात आला असून, त्यांना बरे करण्यासाठी पूर्ण उपचार आरोग्य विभागाकडून देण्यात येणार आहे.कुष्ठरोग तपासणीतदेखील एकूण संशयित ८५१ आढळले आहेत. वैद्यकिय अधिकारींमार्फत त्यांची तपसाणी केली असता १६ जणांना कुष्ठ रोग असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना तात्काळ औषधी देऊन उपचार सुरू केले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. सर्वेक्षणात आढळलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी मार्गदर्शन करत आहे. यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.विशाल चौधरी, डॉ.रेखा शिंदे, डॉ.सायसिंग पावरा, कुष्ठरोग पर्यवेक्षक वंदना वळवी, योगिता पाटील, क्षयरोग पर्यवेक्षक बाळू पाटील, कौस्तुभ बडोदेकर आदींसह सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
क्षयरोग व कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत तळोदा तालुक्यात सर्वेक्षणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, त्यात कुष्ठरोगाचे १६ तर क्षयरोगाचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. या आजाराबाबत मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येतात. त्याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येणार आहे. - डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी, तळोदा