माहूर तालुक्यातील वाईबाजार येथे पोलीस पाटील आशा बळीराम मोरे या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या अधिकृत रॉयल्टी तपासणीसाठी पार्डी रोडवर थांबल्या होत्या. त्यावेळी पडसा येथील ट्रॅक्टर पैनगंगा नदी पात्रातून पडसामार्गे वाई बाजार येथे वाळू घेऊन आला असता पोलीस पाटील मोरे यांनी वाळू वाहतुकीसाठी रॉयल्टी भरली आहे का, अशी विचारणा केली असता ट्रॅक्टरवरील इमरान शेख व त्याचा भाऊ आणि एका अज्ञात इसमाने महिला पोलीस पाटील मोरे यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून मारहाण केली. याप्रकरणी पोलीस पाटील आशा मोरे यांनी सिंदखेड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे तसेच वाळू चोरीचा गुन्हा सिंदखेड पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करीत आहेत. दरम्यान, पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत गावंडे पाटील यांनी या कारवाईचे स्वागत केले असून, पोलीस महासंचालकांच्या पत्रानुसार पोलीस पाटलांना आता संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे पोलीस पाटील यांची कायदा, सुव्यवस्था सांभाळण्यात प्रशासनाला महत्त्वाची मदत मिळेल, असे सांगितले.
महिला पोलीस पाटलास वाळूमाफियांची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:18 IST