अभ्यासू व संयमी नेता गमावला
हिमायतनगर - खा. राजीव सातव यांच्या निधनाने आपणास दु:ख झाले असून, एक अभ्यासू व संयमी नेता, मराठवाड्यातील उभरते नेतृत्व गमावल्याची प्रतिक्रिया माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली. आमच्यामध्ये नेहमी विकासाच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. आमच्यातून ते गेल्याने मोठा आघात झाला. विदर्भ, मराठवाडा पोरका झाला. त्यांची उणीव कधीही भरून निघणार नाही, असे आष्टीकर म्हणाले.
शंभरी गाठलेल्या आजोबांची कोरोनावर मात
मुखेड - मुखेड तालुक्यातील बोरगाव येथील गोविंदराव श्रीरामे यांनी वयाची शंभरी गाठली आहे. त्यांना कोरोना झाला. मात्र, वेळीच उपचार घेतल्याने त्यांनी कोरोनावर सहज मात केली. त्यांना अंधुक दिसते, ऐकू येत नाही, अशक्तपणामुळे चालता येत नाही. अशा परिस्थितीत ताप व अन्नाची चव गेल्यामुळे १ मे रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. आरटीपीसीआरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ३ मे रोजी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे त्यांना हलविण्यात आले. रुग्णालयातील डॉ. व्यंकट भोसले, डॉ. महेश पत्तेवार, डॉ. संतोष टाकसाळे, डॉ. वाघमोडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय सेवा दिली. १० दिवस उपचार घेतल्यानंतर श्रीरामे यांना कोरोनातून मुक्तता मिळाली. ठणठणीत होऊन ते घरी परतले. सध्या त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.