धक्का लागल्याने चालकाला मारहाण
हदगाव तालुक्यातील तामसा येथे कारला धक्का लागल्यानंतर कारचालकाने ट्रॅक्टरचालकाला बेदम मारहाण केली. ही घटना २९ मे रोजी घडली. श्याम यादवराव फिरंगे हे ट्रॅक्टरचालक तामसा रस्त्यावरून जात असताना एका चालकाला त्यांचा धक्का लागला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर फिरंगे हे गावाकडे जात असताना हवेली बारसमोर त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर फिरंगे यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण
नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वडगाव येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना २९ मे रोजी घडली. नवनाथ बालाजी पुयड हे जि.प. शाळेजवळ उभे असताना आरोपी त्याठिकाणी आला. यावेळी त्याने पुयड यांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पुयड यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात कडे मारून त्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणात पुयड यांनी ठाण्यात तक्रार दिली.
व्हिडिओ कॉल केल्यावरून वाद
शहरातील कौठा परिसरात व्हिडिओ कॉल केल्याच्या कारणावरून एका मुलाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शांता प्रकाश पडपनकर या आपल्या भावाच्या घरी असताना भावाच्या मुलाला एका जणाने व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर पडपनकर यांच्या भावाच्या मुलाने त्यांना जाब विचारला. यावेळी आरोपींनी त्याला मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या राहुल पडपनकर यांनाही मारहाण केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.