मुखेड ( नांदेड ) : दुचाकीस रानडुकराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू उपचारादरम्यान बुधवारी सकाळी ६ वाजता झाला. मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास हिब्बट पाटीजवळ हा अपघात झाला होता. मारोती देवकाते ( ५० ) असे मृताचे नाव असून ते शिवसेना शाखा प्रमुख होते.
तालुक्यात सध्या रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. येथील एकलारा मारोती माधव देवकत्ते हे मंगळवारी रात्री मुखेड येथील निवडणुकीची कामे आटोपून सहकाऱ्यांसोबत गावाकडे परतत होते. मुखेड - एकलारा मार्गावरील हिब्बट पाटीजवळ अंधारात देवकत्ते यांच्या दुचाकीस रानडुकरांच्या कळपाने जबर धडक दिली. यामुळे ते गाडीसह रस्त्यावर आदळले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. यानंतर त्यांना मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी (दि.३०) सकाळी ६ वाजता नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, तीन मुले असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.