कोरोनाग्रस्त रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक, पोलीस कर्मचारी यांना अपेक्षीत स्थळी घेवून जाण्यासाठी निलेश डोंगरे या पदवीधर ऑटोरिक्षा चालकाने मोफत ऑटोरिक्षा सेवा सुरू केली आहे. सध्या नांदेड शहरात मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण वाढत आहेत. तसेच कोरोना रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नांदेड शहरात भीतीचे वातावरण आहे. शहरात संचारबंदी असल्याने कोणीही बाहेर येण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत एखाद्या रूग्णाला दवाखान्यात जायचे असेल तर वाहन मिळत नाही. मात्र निलेश डोंगरे याने आपल्या ऑटोवर रूग्णांसाठी मोफत सेवा असे लिहिले आहे. त्यामुळे ज्यांना गरज आहे, ती माणसे निलेशच्या ऑटोचा नंबर आपल्या जवळ ठेवत असून गरज पडल्यास त्यास बोलावून घेत आहेत. एकीकडे शहरातून शासकीय रूग्णालयात घेवून जाण्यासाठी रूग्णवाहिका १ हजार, २ हजार रूपये घेत आहेत. अशा वेळी ऑटोचालक निलेश किरायाच्या ऑटोतून रूग्णांची सेवा करत आहे.
लोकमतशी बोलताना निलेश म्हणाला, या कठीण काळात कोणी कोणाला ओळख देत नाही. सगळ्यांनाच मरण आहे. मग त्याची भीती कशाला बाळगायची. आपल्या मुळे कोणाला मदत होणार असेल तर हीच वेळ आहे, मदत करण्याची. त्यामुळे मी किरायाचा ऑटो घेवून रूग्णांना दवाखान्यात घेवून जात आहे.
चौकट- नवीन नांदेड भागातील हडको येथील निलेश डोंगरे हा युवक पदवीधर असून त्याने राष्ट्रीयस्तरावर तलबारबाजी या खेळाचे नेतृत्व केले आहे. सोशल मिडीयावर त्याने रूग्णांसाठी आपला ऑटो मोफत सेवा देत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.