वादळी पावसामुळे नुकसान
नांदेड : जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. या प्रकारामुळे नांदेड शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता तर ग्रामीण भागात या पावसामुळे घरावरील टीनपत्रे उडून गेल्याने नुकसान झाले.
जोगदंड यांना शिक्षक साहित्य मंडळाचा पुरस्कार
नांदेड : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला व क्रीडा मंडळाच्या वतीने हदगाव तालुक्यातील येवली येथील शिक्षक भगवान जोगदंड यांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याबद्दल मुख्याध्यापक माधव तिडके, प्रल्हाद तेलंग, श्रीधर नंदू, अनिरुद्ध देशमुख आदींनी जोगदंड यांचे कौतुक केले.
हडको भागात घर फोडले
नांदेड : हडको येथील बसवेश्वर नगरातील प्रफुल्लचंद मानकरी यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख ७० हजार असा १ लाख ७७ हजारांचा ऐवज चोरून नेला. मानकरी यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सिलिंडर दरवाढीमुळे नागरिक त्रस्त
नांदेड : घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे महागाईने होरपळलेली जनता त्रस्त झाली आहे. त्यातच केंद्र शासनाकडून देण्यात येत असलेली सबसिडीही बंद झाल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांची आर्थिक कोंडी झाली आहे. केंद्र शासनाने उज्ज्वला योजनेतील सिलिंडरचे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.
झुलेलाल भवन येथे लसीकरण
नांदेड : कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लसीकरण शिबिराचे तीन दिवस संपल्यानंतर झुलेलाल भवन येथे सुरू असलेल्या शिबिरास आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे हे शिबिर आता बुधवारी २८ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू राहणार असल्याचे हरीश लालवाणी व संयोजकांनी कळविले आहे.
सिडको परिसरात कोविड सेंटरची गरज
नांदेड : सिडको-हडको या नवीन नांदेडच्या आजूबाजूला मोठा ग्रामीण भाग आहे. या भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही मोठी आहे. दुसरीकडे या परिसरात रुग्णालयांची संख्या कमी असल्याने रुग्णांना नांदेड शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे सिडको-हडको परिसरात कोविड सेंटर उभारण्यासाठी मनपाने पुढकार घेण्याची मागणी नगरसेवक श्रीनिवास जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे.