अर्धापूर : महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगर पंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद दिला. १०० नागरिकांनी लस घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी विद्या झिने, पो. नि. विष्णुकांत गुट्टे, मुख्याधिकारी मारोतराव जगताप, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी उत्तमराव इंगळे, विशाल लांडगे, शेख लायक आदी उपस्थित होते.
मुखेडात यंदा शोभायात्रा रद्द
मुखेड : तालुक्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या रोजी दरवर्षी शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही ही शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. यंदाही प्रशासनावर ताण नको व कोरोनाच्या संकटकाळात सर्वच मिळून लढूया म्हणत गुढीपाडव्याची शोभायात्रा रद्द केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बळीराजा शेतीच्या मशागतीत गुंतला
मालेगाव : बळीराजा शेतात उन्हाळी कामे करण्यात गुंतला असून, शेती मशागतीची कामे सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागात सर्वत्र उन्हाळी कामे सुरू आहेत. कोरोनामुळे नागरिक कोरोनाच्या भीतीने घरात बसून आहेत. अशा वेळी शेतकरी शेतातील उन्हाळी कामे करण्यासाठी सरसावला आहे. मागील वर्षीसुद्धा कोरोनामुळे लाॅकडाऊन लावण्यात आले होते. त्यावेळी शेती व्यवसायाने सर्वांना तारले होते. यावर्षीसुद्धा कोरोनामुळे विदारक चित्र निर्माण झाले आहे. शेतकरी मात्र शेतात परिश्रम करताना दिसत आहेत.
लाभार्थ्यांना जादा दराने वाळूची विक्री
हिमायतनगर : शहरापासून जवळच वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन व अवैधरीत्या वाहतूक केली जात असून, घरकुल लाभार्थ्यांना मात्र जादा दराने वाळू विकत घेण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे चोरट्या विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे. बेसुमार वाळू उपशामुळे या भागातील पर्यावरणाचे नुकसान होत असून, दिवसेंदिवस नदीपात्र कोरडे पडत चालले आहे. नदीकाठावरील गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
लस घेऊन सर्वांनी सुरक्षित राहावे
हिमायतनगर : कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी कोविड लस घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन केले आहे. रुग्णांची संख्या वाढत असून, मृत्यूदरामुळे चिंतेचे वातावरण आहे. अशा वेळी लस घेऊन सर्वांनी सुरक्षित राहावे. आ. माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या माध्यमातून आपल्या गावात आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्रात लस उपलब्ध असल्यामुळे नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन कैलास माने यांनी केले आहे.
कोरोनाविषयी जनजागृृती
कंधार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उस्माननगर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून रॅली काढून नागरिकांना कोरोनाविषयी रॅलीद्वारे जनजागृती केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्याम सावंत, सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदाडे, सरपंच प्रतिनिधी व्यंकटराव पाटील घोरबांड, अमिनशा फकीर, शिवशंकर काळे, कमलाकर शिंदे, गंगाधर भिसे आदी उपस्थित होते.
कामठा उपकेंद्रात लसीकरण सुरू
कामठा : येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांत या उपकेंद्रात ५०० जणांचे लसीकरण करण्यात आले. यापूर्वी कामठा व शेजारच्या गावातील व्यक्तींना लस घेण्यासाठी मालेगाव किंवा अर्धापूर येथे जावे लागत होते. आता कामठा येथेच लस मिळत असल्यामुळे ४५ वर्षे वयाच्या पुढील जवळपास ५०० जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.