नांदेड : तालुक्यातील पावडेवाडी येथील शेतकरी लक्ष्मण पावडे यांच्या शेतातील ज्वारीचा कडबा शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. ही घटना २५ मे रोजी घडली. पश्चिम वळण रस्त्यालगत शेत गट क्रमांक १०० ब, १ मधून एलटी लाइन गेली आहे. या लाइनची तार खाली लोंबलेली असून, तारांचा एकमेकांना स्पर्श होऊन २ हजार ५०० ज्वारीच्या पेंड्याची गंजी जळून खाक झाली. सदर घटनेचा पंचनामा तलाठी सचिन नरवाडे यांनी केला.
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती
नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी सकाळी १० वाजता खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात साजरी करण्यात येणार असून, यावेळी खा.चिखलीकर यांच्यासह व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रवीण साले, श्रावण पाटील भिलवंडे, डॉ.संतुकराव हंबर्डे, चैतन्यबापू देशमुख, किशोर देशमुख, विजय गंभीरे, ॲड.दिलीप ठाकूर, सुशील चव्हाण आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती व्यंकटराव मोकले यांनी दिली.
कांचनगिरे यांची निवड
नांदेड : वाघाळा शहर काँग्रेसच्या ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षपदी विनोद कांचनगिरे तर शहर जिल्हा सरचिटणीसपदी संजय इंगेवाड यांची निवड करण्यात आली. आ.मोहन हंबर्डे, आ.अमरनाथ राजूरकर यांनी ही निवड केली. यावेळी डी.बी. जांभनूरकर, प्रा.अशोक मोरे, प्रा.ललिता शिंदे, डॉ.नरेश रायेवार, शेख मोईन, प्रमोद टेहरे आदी उपस्थित होते.
विकास कामांना कोरोनामुळे ब्रेक
नांदेड : मागील वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कोरोनाशी लढत आहे. त्यामुळे इतर विकास कामांकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेष म्हणजे, शासनाने अनेक विकास कामांचे अनुदान दिले नाही. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्ते, नाली, पाणीपुरवठा आदी विकास कामे ठप्प आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे आता करणे अशक्य आहे.
बांधकाम साहित्याचा वाहतुकीला अडथळा
नांदेड : शहरातील बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून, वाळू, सिंमेट, विटा, गिट्टी, गजाळी आदी साहित्य रस्त्याच्या बाजूला टाकलेले आहे. बांधकाम पूर्ण होईपर्यंत या रस्त्यावरून वाहतूक करताना, वाहनधारकांना अडथळे सहन करावे लागणार आहेत. महापालिकच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार वाढत आहे. बांधकाम साहित्य रस्त्यावर साठविले जात असल्याने, वाहतुकीस अडथळा होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
ट्रॅक्टर मालकांना सुगीचे दिवस
नांदेड : शेतातील खरीप हंगामापूर्वीचे मशागतीचे कामे अंतिम टप्प्यात असून, या कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे मशागतीचे कामे केली आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना सुगीचे दिवस आले आहेत. डिझेलचे भाव वाढल्याने ट्रॅक्टर मालकांनीही दरात वाढ केली आहे.
नवामोंढ्यात शेतकऱ्यांची गर्दी
नांदेड : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून, खते, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नवामाेंढ्यात गर्दी केली आहे. पावसाळा तोंडावर आला असून, या वर्षीही समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, दुसरीकडे खते, बियाण्यांचे वाढलेले भाव, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.