चौकट- चिठ्ठी दिली का जबाबदारी संपली !
जिल्ह्यात ग्रामीण, उपजिल्हा आणि शामनगर येथील स्त्री-रुग्णालयांत प्रसूतीसाठी रुग्ण येतात; परंतु या ठिकाणचे डॉक्टर रुग्णाची तपासणी केल्यानंतर अत्यवस्थ असल्याचे कारण पुढे करून सदरील रुग्णाला थेट विष्णूपुरी येथील रुग्णालयाचे रेफर लेटर देतात. विशेष म्हणजे त्यांनी त्याच ठिकाणी ही प्रसूती करणे अपेक्षित असते. रेफर लेटर देताना जननी सुरक्षा योजनेअंतर्गत रुग्णाला आणून सोडणे आणि तपासणीनंतर पुन्हा घेऊन जाणे याचा तर जणू त्यांना विसरच पडला आहे.
चौकट- अभिप्राय पुस्तकात सर्व नोंदी
विष्णुपुरी येथील रुग्णालयात वॉर्ड क्रमांक १६ मध्ये रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी अभिप्राय पुस्तक ठेवण्यात आले आहे. प्रसूतीनंतर सुट्टी झाल्यावर डॉक्टर, कर्मचारी यांची वागणूक, उपचार यांबाबत काय अनुभव आला, याच्या नोंदी येथे करण्यात येतात.
चौकट- आला रुग्ण - पाठव नांदेडला
जिल्हाभरात रुग्णालयांचे जाळे उभारण्यात आले आहे; परंतु या ठिकाणी असलेले डॉक्टर आणि कर्मचारी फक्त दिवस काढण्याचेच काम करीत असल्याचे दिसून येते; कारण ‘आला रुग्ण की पाठव नांदेडला’ असाच प्रकार सध्या सुरू आहे.